दापोली, 21 डिसेंबर : किल्ले स्वच्छता मोहिमेदरम्यान मंडणगड (Mandangad ) तालुक्यात बाणकोट ( Bankot fort) उर्फ हिम्मतगडावर लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी कडी हा ऐतिहासिक ठेवा आढळून आला आहे. या वस्तू बाणकोट ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. बाणकोट ग्रामपंचायतीकडून ही माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे.
याच मोहिमे दरम्यान किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील देवडी/अलंगामध्ये 2 इंच लांबी रुंदी व 10 इंच व्यास असलेला लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी दरवाजाच्या जंग लागलेले कड्या सापडल्या आहेत. या वास्तूंची माहिती सहाय्यक संचालक विलास वाहने यांना देण्यात आली. त्यांनी सुचविल्या प्रमाणे सदर वस्तू या स्थानिक बाणकोट ग्रामपंचायत सरपंच हमीदा परकार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
पुरातत्व विभाग अधिकारी हे बाणकोट किल्ल्याला भेट द्यायला येतील तेव्हा तोफगोळा व कडी आपल्या ताब्यात घेतील, अशी माहिती श्रीवर्धन विभाग अध्यक्ष योगेश निवाते आणि दापोली तालुका प्रशासक ललीतेश दवटे यांनी दिली.
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी 14 वर्षापूर्वी स्थापन केली आहे. संस्थेमार्फत महारष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनाचे कार्य माहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गडकोटांवर राज्य,केंद्र पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. आजवर संस्थे मार्फत 1800 हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा झाल्या असून 2000 किल्ल्यांची दुर्ग दर्शन मोहिमा घेण्यात आल्या आहेत. तसेच लोकवर्गणीतून प्रतापगड आणि वसंतगड तटबंदी बुरुज बांधकाम, 13 प्रवेशद्वार व 40 तोफांना तोफगाडे बसविण्यात आलेले आहेत.
औरंगाबादमध्ये सापडली ऐतिहासिक नाणी
दरम्यान, औरंगाबादमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानात ऐतिहासिक दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे नाणी सापडली आहे. प्रियदर्शनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम चालू आहे. स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी ही नाणी सापडली आहे.
प्रत्येक नाण्यावर वेगवेगळ्या दशकाची नावे आहेत. काहींवर 1680, 1854 आणि 1881 काह असे लिहिले आहे. जवळपास 2 किलोग्राम वजनाची ही नाणी आहे. प्रथमदर्शनी तरी ही नाणी तांब्याची असल्याचे समजते आहे. जेसीबीने गड्ड्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर मजुराला त्यातील माती काढता वेळेस टोपल्यांमध्ये ही नाणी सापडली आहे. त्यानंतर ही नाणी जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि पोलिसांकडून सुपुर्द करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.