मुंबई, 06 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने या जगाला निरोप दिला पण तो प्रत्येक चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे. अशात आता त्याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ या सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. आज सकाळपासून या ट्रेलरसाठी चाहते उत्सुक होते. हा ट्रेलर पाहिल्यानंतर सुशांतसिंग राजपूतच्या उत्तम अशा अभिनयाने तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्मात्यांनी अशी घोषणा केली होती की, या चित्रपटाचा ट्रेलर 06 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची त्याचे चाहते वाट पाहत होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा हॅशटॅग ट्रेंड देखील करत होता. दरम्यान या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूतबरोबर संजना सांघी (Sanjana Sanghi) हा नवा चेहरा दिसणार आहे.
सकाळपासूनच ट्विटरवर अनेक लोकं #DilBecharaTrailer हा हॅशटॅग वापरून या सिनेमाला पाठिंबा दर्शवत होते. सुशांतच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच इतकी क्रेझ पाहायला मिळत होती. दरम्यान काहींनी या चित्रपटाच्या ट्रेलरला 100 मिलियन views मिळवून देण्याबाबत देखील भाष्य केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर करण्याचा सुशांतच्या चाहत्यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा ‘दिल बेचारा’ रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. अनेकांनी सोशल मीडियावर अशी मागणी केली होती की, हा चित्रपट सिनेमा गृहातच प्रदर्शित केला जावा. 24 जुलै रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. संपादन - रेणुका धायबर

)








