मुंबई, 23 सप्टेंबर : सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणे क्रिकेटर्सही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही खूप मोठी असते. अनेकदा खेळाडू हे प्रतिस्पर्धी संघ तसंच स्वत:च्या टीममधील सदस्याचं अभिनंदन व कौतुक करत असतात. पण कधीकधी चाहत्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या पोस्टही पाहायला मिळतात. नुकतंच पाकिस्तानाचा फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीनं त्याच्या टीमचा कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला स्वार्थी संबोधलं आणि त्यांच्यापासून सुटका व्हावी, असं ट्विट करत क्रिकेटप्रेमींसह सर्वांचीच फिरकी घेतली.
काय आहे प्रकरण?
नुकत्याच पाकिस्तानातील कराचीत झालेल्या टी-20 मॅचमध्ये पाकिस्तानानं 10 विकेटने इंग्लंडचा पराभव केला. कॅप्टन बाबर आझम आणि रिझवानने उत्कृष्ट बॅटिंग (Batting) करत 203 धावा करून संघाला 19.3 ओव्हरमध्ये मॅच जिंकून दिली. मॅच जिंकल्यानंतर दुखापतीमुळे टीमबाहेर असलेल्या फास्ट बॉलरने ट्विटरवर दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे. शाहीनचं ट्विट खूप व्हायरल होतंय. यात बाबर आणि रिझवानला स्वार्थी म्हटलं गेलंय.
शाहीन पोस्टमध्ये म्हणतो की, ‘आता बाबर आणि रिझवानपासून सुटका करून घेण्याची वेळ येऊन ठेपलीय. या दोघांनाही टीमच्या बाहेर काढून टाकलं जाणं महत्त्वाचं आहे.’ शाहीननं असं ट्विट करण्यामागे काय कारणं आहेत याचं उत्तर पूर्ण ट्विट वाचल्यानंतरच कळतं.
काय म्हटलंय शाहीनच्या ट्विटमध्ये?
शाहीन आफ्रिदीनं सर्वांना आश्चर्यचकित करणारं ट्विट केलयं. यात त्याने लिहिलंय, ‘माझ्या मते, कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांपासून सुटका करून घेण्याची वेळ आली आहे. हे दोघेही स्वार्थी आहेत. दोघे व्यवस्थित खेळले असते तर सामना 15 ओव्हरमध्येच संपुष्टात आला असता. पण हे दोघे शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळले. या मुद्द्यावर आंदोलन केलं जाणं आवश्यक आहे, हो ना…?’
I think it is time to get rid of Kaptaan @babarazam258 and @iMRizwanPak. Itne selfish players. Agar sahi se khelte to match 15 overs me finish hojana chahye tha. Ye akhri over tak le gaye. Let's make this a movement. Nahi? 😉
Absolutely proud of this amazing Pakistani team. 👏 pic.twitter.com/Q9aKqo3iDm — Shaheen Shah Afridi (@iShaheenAfridi) September 22, 2022
ट्विटच्या शेवटच्या ओळीत उकललं गूढ
शाहीनचं ट्विट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्स चकित झाले. शाहीन त्याच्याच टीममधील खेळाडूंबद्दल अशी प्रतिक्रिया का देतोय, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं ट्विट पाहून पाकिस्तानी टीममध्ये फूट पडली की काय? असा प्रश्न मनात निर्माण होतोय. पण ट्विटच्या शेवटच्या ओळीत पूर्ण अर्थ दडलेला आहे. ते वाचल्यावर तो संघातील खेळाडूंचं कौतुक करत असल्याचं समजतं. शेवटच्या वाक्यात त्यानं पाकिस्तानच्या जबरदस्त टीमवर गर्व असल्याचं म्हटलंय. याचा सरळ अर्थ हाच होतो की, बाबर आझम आणि रिझवानच्या स्ट्राइक रेटवरून (Strike Rate) सतत टीका करणाऱ्यांना शाहीननं त्याच्या ट्विटमधून उत्तर दिलंय. पाकिस्तानी टीममध्ये बाबर आणि रिझवान या दोघांवर मोठी जबाबदारी आहे. दोघेही ओपनिंगला येऊन शेवटपर्यंत टिकून खेळतात ही मोठी जमेची बाजू असून, याचंच कौतुक शाहीननं ट्विटद्वारे केलंय.
Video: 49 वर्षांच्या सचिनची जबरदस्त फटकेबाजी पाहून तुम्हालाही आठवेल 'डेझर्ट स्ट्रॉम'
बाबर-रिझवानची जबरदस्त खेळी
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये बाबर आझमने 66 बॉलमध्ये नाबाद 110 रन्स केल्या. टी-20 मधील ही त्याची दुसरी इंटरनॅशनल सेंच्युरी होती. बाबरने 5 सिक्स आणि 11 फोर लगावल्या. तर रिझवाननं 66 बॉलमध्ये 88 रन्सची नाबाद खेळी केली. त्याने 4 सिक्स आणि 5 फोर लगावले. मॅचमध्ये रिझवानचा स्ट्राइक रेट 172.55 तर बाबरचा स्ट्राइक रेट 166.67 इतका होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England, Pakistan