पुणे, 21 एप्रिल : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महापालिका हद्दीत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरीतून बाहेर कुणी जाऊ नये आणि जिल्ह्यातून कुणी येऊ नये यासाठी हद्दी,सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील बराच भाग आधीच सील करण्यात आला आहे. त्यानंतर आता वाहनचालकांना वाहनात पेट्रोल भरण्यासाठीची वेळ निश्चित करून देण्यात आला आहे.
पुणे पोलीस आयुक्त ( गुन्हे ) व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी 27 एप्रिलपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्यास सांगितले आहे. सदर वेळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेतील वाहनांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जाणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील पंप सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत सुरू असतील .
दरम्यान, पुणे शहरात संचारबंदी असताना देखील मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. घराबाहेर पडणे हे संचारबदी कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे समाजात एका व्यक्तीमुळे इतरांना त्रास होत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.
हेही वाचा - पुणेकरांचे रक्षक कोरोनाच्या टार्गेटवर, आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना झाली लागण
संचारबदी दरम्यान पुण्यात मोठ्या प्रमाणात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून आत्तापर्यंत 12 हजार 988 जणांवर गुन्हे दाखल केले, तर 31 हजार 722 वाहने जप्त केली आहेत. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news