पुणे, 21 एप्रिल : जगभरातील अनेक देश सध्या कोरोना संकटाच्या सावटाखाली आहेत. भारतालाही या व्हायरसने धडक दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपले पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. मात्र लोकांच्या याच रक्षकांना आता कोरोना हा धोकादायक व्हायरस लक्ष्य करू लागला आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पुण्यात आता आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी पुण्यातील एका पोलिसाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी मुंबईतही उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यासह इतर काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांनीही सेवेवर असताना जास्तीत जास्त काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये 25 कर्मचारी पॉझिटिव्ह पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण 1000 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 25 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये 19 नर्स, 3 सपोर्ट स्टाफ आणि 3 क्लिनिकल असिस्टंट यांचं अलगीकरण केलं गेलं. विशेष म्हणजे कुणालाही कोरोनाची लक्षणे दिसून आली नव्हती. हेही वाचा- गृहमंत्री भाजपच्या टार्गेटवर, उद्धव ठाकरे आणि अजित पवारांकडे केली ‘ही’ मागणी केंद्र सरकारचे पथक अखेर पुण्यात दाखल पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची स्थिती जाणून घेण्याकरता केंद्र सरकारचे पथक अखेर पुण्यात दाखल झाले असून इथल्या परिस्थितीची त्यांनी जिल्हाधिकारी ,आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली. तसंच अजून कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दलच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या. यावेळी महापौर मुरली मोहोळ उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील परिस्थितीची माहिती दिली. आज दिवसभरात हे पथक विविध ठिकाणाची माहिती घेणार आहे आणि त्यानतंर इथल्या सर्व गोष्टी बाबत केंद्र सरकारला कळवणार आहेत. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.