मुंबई, 22 एप्रिल : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातून 100 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती काल समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा चांगली बातमी समोर आली आहे. उपनगरीय रुग्णालयातूनही 100 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची बातमी आहे. यामध्ये 8 बालके आणि 14 ज्येष्ठ नागरिकांसह एकाच कुटुंबातील 6 रुग्णांचाही समावेश आहे. या 102 जणांनी कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढा यशस्वी करुन दाखवला आहे.
मुंबईत (BMC) कोरोनाबाधितांचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र मुंबईतील अनेक भागात लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात अडथळा येतो. अशातच काल मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयातून 100 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची बातमी आली होती. त्यानंतर आज मुंबईतील उपनगरीय रुग्णालयातील 102 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. विशेष म्हणजे या रुग्णांमधील 6 जणं एकाच कुटुंबातील होती. हे 6 जणं बरे झाले असून आज घरी परतले आहेत. या नागरिकांचा कोरोनाविरोधातील लढा यशस्वी झाला आहे. या उपनगरीय रुग्णालयांमधून कोरोनाचे 102 रुग्ण आजवर बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये 45 स्त्रिया व 57 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये 8 बालकांचा आणि 60 वर्षे वयावरील 14 ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप जाधव यांनी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि उपनगरीय रुग्णालयातील प्रभावी वैद्यकीय सेवेनंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे 39 रुग्ण हे जोगेश्वरी परिसरात असणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आहेत. या खालोखाल घाटकोपरमधील राजावाडी परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा रुग्णालयातून 27 रुग्ण, तर कुर्ला परिसरातील खान बहादुर भाभा रुग्णालयातून 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वरील व्यतिरिक्त वांद्रे पश्चिम परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालयातून 9 रुग्ण, कांदिवली पश्चिम परिसरातील 'भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून' 3 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
संबंधित -निशब्द! लॉकडाऊनमध्ये आसरा घेतलेल्या शाळेला रंग देत मजुरांनी मानले आभार
संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.