नवी दिल्ली 07 मार्च : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना पुन्हा एकदा मान वर काढत असल्याची स्थिती आहे. शनिवारी देशात कोरोनाची 18,327 नवी प्रकरणं (Coronavirus Update) समोर आली आहेत. यानंतर आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा आकडा 1.11 कोटीवर पोहोचला आहे. शनिवारी देशात तब्बल 36 दिवसांनंतर कोरोना रुग्णांचा आकडा इतका जास्त आला आहे. विशेषतः महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 82 टक्के रुग्ण याच राज्यांमधील आहेत.
याशिवाय देशातील 8 राज्य आणि 63 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. या जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. यात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारखे पहाडी राज्यही सहभागी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी बैठक घेतली. त्यांनी सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांतील आकड्यांची यादी जाहीर केली, तेव्हा असं लक्षात आलं की राज्य सरकारांचं या संवेदनशील जिल्ह्यांकडे लक्षच नाही. सोबत या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनानंही कोरोना चाचणीचा वेग कमी ठेवलेला आहे. मंत्रालय गेल्या अनेक दिवसांपासून या राज्यांना पत्र लिहूमन जिल्ह्यांमध्ये सतर्कता बाळगण्याचं आवाहन करत आहे. मात्र, तरीही या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी शनिवारी दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, गोवा, चंडीगड, हरियाणा आणि आंध्र प्रदेशच्या आरोग्य सचिव आणि राज्य आरोग्य अभियान संचालक यांच्यासोबत बैठक घेतली आहे. यातून असं समोर आलं आहे, की 8 राज्यातील 63 जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती गंभीर आहे. यात दिल्लीतील 11 जिल्ह्यांमधील 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हरियाणामधील 15, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 10-10, हिमाचल प्रदेशचे 9, उत्तराखंडमधील 7, गोवामधील 2 आणि चंदीगडमधील एका जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या कमी असल्याचं समोर आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये आरटी पीसीआर तपासणीतही हलगर्जीपणा होत असल्याचं दिसत आहे. डॉ. व्ही.के. पॉल यांनी या जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती दिली आहे. तेथील परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्याची ही योग्य वेळ आहे, असंही ते म्हणाले.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.