'लॉकडाऊन तोडा...राज्यातील सर्व दुकाने 1 ऑगस्टपासून उघडा', प्रकाश आंबेडकर झाले आक्रमक

'लॉकडाऊन तोडा...राज्यातील सर्व दुकाने 1 ऑगस्टपासून उघडा', प्रकाश आंबेडकर झाले आक्रमक

प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 31 जुलै : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'लॉकडाऊन मान्य करू नका. राज्यातील सर्व दुकाने 1 तारखेपासून उघडा,' असं आवाहन त्यांनी दुकानदारांना केलं आहे. त्याचवेळी 'पाहिजे तर मला अटक करा. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी घाबरत नाही,' असं म्हणत राज्य सरकारलाही आव्हान दिलं आहे.

'देशात आपल्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोक कोरोनामुळे बाधित होऊ शकतात आणि केंद्र आणि राज्य सरकार 95 टक्के लोकांवर अन्याय करीत आहेत. येत्या 1 तारखेपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून व्यवहार करावेत. बकरी ईद मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने साजरी करावी आणि रक्षाबंधनही व्यवस्थित मोकळेपणाने साजरे करावं,' असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केलं आहे.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचा मोठे हाल होत आहे. याविरोधात आता विविध नेते भूमिका घेऊ लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगत लॉकडाऊनविरोधात मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊनबाबत फेरविचार करणार का, हे पाहावं लागेल.

लॉकडाऊन वाढला, काय आहेत नियम आणि अटी?

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती देण्यात आली आहे.

या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.

Published by: Akshay Shitole
First published: July 31, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या