कोलकाता, 6 मे : आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनचे (IPL 2021) भारतामध्ये आयोजन करण्यात काही चूक नव्हती, असा दावा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) केला आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या (Corona Pandemic) काळात आयपीएलचं देशात आयोजन करणे हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. बीसीसीआयनं 14 व्या सिझनसाठी 6 शहरांची निवड केली होती. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी म्हंटलं आहे. सौरव गांगुलीनं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयपीएल 14 च्या आयोजनाबाबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. “आम्ही भारतामध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा परिस्थिती इतकी खराब नव्हती. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी झाली होती. आम्ही इंग्लंड दौऱ्याचंही यशस्वी आयोजन केलं. या आयपीएलचं युएईमध्ये आयोजन करण्याबाबतही चर्चा झाली होती. पण, फेब्रुवारी महिन्यात देशात कोव्हिडच्या केसेस खूप कमी होत्या.” याकडं गांगुली यांनी लक्ष वेधलं. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी असं काही नव्हतं. आम्ही यूएईबाबतही विचार केला. त्यानंतर आयपीएल 2021 चं आयोजन भारतामध्ये करण्याचा निर्णय घेतला. बायो बबलच्या सुरक्षेत चूक? आयपीएलमधील बायो-बबलच्या सुरक्षेत चूक झाली का? किंवा एका व्यक्तीनं बायो-बबल तोडलं असं वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना गांगुली यांनी सांगितलं की, “मला असं वाटत नाही. आम्हाला मिळालेल्या रिपोर्टमध्ये बायो-बबलचं उल्लंघन झाल्याचा उल्लेख नाही. हे कसं झालं हे सांगणं खूप अवघड आहे.” असं गांगुलीनं स्पष्ट केलं. असा हवा कॅप्टन! कोरोना संकटात महेंद्रसिंह धोनीचा निर्णय वाचून वाटेल अभिमान आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. केकेआरचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), संदीप वॉरियर (Sandeep Warrior) तसंच दिल्लीचा अमित मिश्रा (Amit Mishra), हैदराबादचा ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. चेन्नई सुपरकिंग्सचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि अन्य एका सपोर्ट स्टाफची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं बीसीसीआयसा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.