Home /News /news /

BREAKING : बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, 48 तासांत द्यावं लागणार उत्तर

BREAKING : बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, 48 तासांत द्यावं लागणार उत्तर

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का दिला आहे.

    विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 24 जून : महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित नोटीस बजावण्यात आल्यानंतर बंडखोर आमदारांना 48 तासांची मुदत असेल. या दरम्यान त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी संधी असेल. त्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल. शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी विधान भवनात आज दुपारपासून हालचाली सुरु होत्या. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आज दुपारी पाच वाजेपासून विधान भवनात दाखल झाले होते. तेव्हापासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या विषयावर मंथन सुरु होतं. या दरम्यान महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे देखील विधान भवनावर दाखल झाले. झिरवळ आणि महाधिवक्ता यांच्यात सलग एक तासाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. ('मातोश्री'त सत्ताकेंद्र, पवार-ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास खलबतं, उद्या मोठा निर्णय होणार?) शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव सादर करण्याचा दावा दोन दिवसांपूर्वी केला होता. याच अविश्वासाच्या ठरावाचा धागा पकडत नरहरी झिरवळ आपल्याला अपात्र ठरवू शकत नाहीत, असा दावा बंडखोर आमदारांनी केला होता. पण त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला होता. नरहरी झिरवळ आज दुपारपासून विधान भवनात दाखल होते. तिथे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित होते. शिवसेनेने 16 आमदारांच्या अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर चर्चा झाली. या विषयावर सलग तब्बल चार तासांपासून चर्चा सुरु होती. अखेर रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास महाधिवक्ता देखील विधान भवनात दाखल झाले. त्यानंतर नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत अखेर बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बंडखोर आमदारांना नोटीसमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात येतील. त्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बंडखोर आदारांना दोन दिवसांचा वेळ दिला जाईल. दोन दिवसात आमदार आपले उत्तर दाखल केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. शिवसेनेचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. "शिवसेना सोडून काही लोक दूर जाऊन लपलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यागी भावनेने वर्षा निवासस्थान सोडून दिले. मुख्यमत्र्यांनी त्या आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. त्यांना शिवसेनेच भगवा सोडून कमळाबाईचा साथ पकडावी लागेल. आता त्यांना गट निर्माण करता येणार नाही तर दुसऱ्या पक्षात जावं लागेल. आज आम्ही सर्व उत्तर दिले आहे. आज कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. येत्या 4 दिवसांत कारवाई होईल", अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Shiv sena

    पुढील बातम्या