04 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची आज चंद्रपूर इथं जाहीर सभा झाली. या प्रचार सभेत त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलत काँग्रेस आणि सोनिया गांधींवर जोरदार टीका केली. निर्भया फंडासाठी केंद्र सरकार 1 हजार कोटी देणार होतं मात्र 1 रूपयाही दिला नाही असा आरोपही मोदींनी केला.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी एक महिला आहेत. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार 1 हजार कोटी देणार्या निर्भया फंडाची घोषणा करण्यात आली. पण या फंडातील 1 रुपयाही खर्च करण्यात आलेला नाही असा आरोपही मोदींनी केला.
लातूरमधील काँग्रेसच्या युवा नेत्या कल्पना गिरी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी काँग्रेसमधील दोन पदाधिकार्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन मोदींनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली.
काँग्रेस आणि नक्षलवाद्यांचा संपर्क असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नक्षलवाद्यांबाबत मवाळ आहे अशी टीका करतानाच नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडावा, असं आवाहन त्यांनी केलं.