14 सप्टेंबर : लोहपुरुष असं म्हटलं जाणारे लालकृष्ण अडवाणी यांचा भारतीय राजकारणातला प्रवास दीर्घ आणि विलक्षण आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी भाजपची बांधणी केली. तेच अडवाणी आज पक्षात एकाकी पडलेत. लोहपुरुष लालकृष्ण अडवाणींनी गेल्या वर्षी संकेत दिले होते. की आपल्यामध्ये अजून धमक आहे. आणि गेल्या वर्षीच्या गुजरात निवडणूक प्रचारसभेतलं हे छायाचित्र…पुढचा मार्ग कसा असेल त्याचे हे संकेत. 1980 मध्ये ज्या पक्षाची उभारणी केली त्याच पक्षात भारतीय राजकारणातले रथयात्री आज एकाकी पडलेत. आणि त्यांच्या या एकाकीपणाला कारणीभूत आहेत. त्यांना ज्यांना मार्गदर्शन केलं, घडवलं, आणि गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं तेच नरेंद्र मोदी. या वर्षीच्या जुनमध्ये मोदींची भाजपच्या निवडणूक प्रचारसमितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर अडवाणींनी पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला.आणि आपला विरोध नोंदवला. त्याच्या काही महिन्यांनंतरच त्यांच्या विरोधाला न जुमानता मोदींची पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली. अडवाणी आणि त्यांच्या समर्थकांसाठी ही न पचवता येणारी गोष्ट आहे. पण इतरांना अडवाणींची ही भूमिका मान्य नाही. प्रदीर्घ राजकीय अनुभव गाठीशी असतानाही अडवाणींना नेहमी दुय्यम स्थानच मिळालं. तीन वेळा भाजपचे अध्यक्ष, माजी उपपंतप्रधान, कुशल संघटक, असे अनेक गुण असूनही त्यांच्यापेक्षा अधिक करिश्मा असणार्या वाजपेयींच्या तुलनेत अडवाणींचं स्थान दुसरंच राहिलं. अडवाणींची प्रतिमा कट्टर हिंदुत्त्ववादीची..तर वाजपेयींचं नेतृत्त्व सर्वसमावेशक आणि म्हणूनच सर्वांना मान्य असलेलं. कराची भेटीवेळी अडवाणींनी आपली ही कट्टर हिंदुत्त्वाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. जिन्नांच्या धर्मनिरपेक्षतेची स्तुती केली. पण संघाला हे रुचलं नाही.आणि भाजपच्या अध्यक्षपदावरून अडवाणींना बाजूला व्हावं लागलं. जेव्हा संघ परिवारात अडवाणींचं स्थान ढासळत होतं, त्याचवेळी नरेंद्र मोदींचं स्थान मात्र बळकट होत होतं. राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची मोदींची महत्त्वांकाक्षा वाढीस लागली, तसं मोदी आणि अडवाणी यांच्यातला दुरावा वाढला.2011 मध्ये अडवाणींनी गुजरातमधून देशव्यापी यात्रेची घोषणा केली. त्याचवेळी मोदींनी गांधीनगरमध्ये 3 दिवसांचं सद्धाभवना उपोषण सुरू केलं.अडवाणींना अखेर आपली यात्रा बिहारमधून सुरू करावी लागली. हिंदुत्त्व हिरो…आक्रमक व्यक्तिमत्त्व…अडवाणींसाठी पुर्वी जी विशेषण वापरली जात..नेमकी तिच विशेषणं आज मोदींसाठी वापरली जातात. अडवाणी हे भाजपचा कणा होते. लोसकभेत 1980 मध्ये भाजपच्या केवळ दोन असलेल्या जागा त्यांनी 1998 मध्ये 182 पर्यंत नेल्या.पण तेच अडवाणी आज पक्षात एकाकी पडलेत. 85 वर्षांच्या या रथयात्रीच्या राजकीय यात्रेला खीळ आता खीळ बसल्याचं दिसतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.