04 ऑक्टोबर : सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणाऱ्या काँग्रेस आणि आपवर भाजप आणि मित्रपक्षांनी हल्लाबोल केलाय. ज्यांना सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे हवेत त्यांनी पाकिस्तानात जावं असा टोला भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारतींनी लगावलाय. तर देशाच्या सुरक्षेसाठी सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेनंही सरकारची बाजू घेतलीये. उरी हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला. भारतासह जवळपास सर्वच देशांनी या हल्ल्याबद्दल दुख व्यक्त केलं. पाकिस्तानच्या आगळीकाचा वेळोवेळो पुरावा देऊनही पाकने हातवर केले. अखेर भारताने दहशतवादाविरोधात कडक पाऊलं उचलली. गेल्या आठवड्यात भारताने सर्जिकल स्ट्राईक केली. पाकच्या हद्दीत घुसून 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त केला. सर्जिकल स्ट्राईक बनावट होती असा आरोपच दोघांनी केला. तसंच जर सर्जिकल स्ट्राईक झाली असेल तर पुरावे द्या अशी मागणीही केली. ‘पाकिस्तानाला जा’ विरोधकांच्या या बेछुट आरोपांचा भाजप नेत्यांची चांगलाच समाचार घेतला. ज्यांना सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे हवेत त्यांनी पाकिस्तानचं नागरिकत्व घ्यावं असा टोला भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारतींनी लगावलाय. तर देशाच्या हितासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. आम्ही देशाचा मान सन्मानाला ठेच पोहोचेल असं कोणतंही कृत्य केलं नाही अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली. ‘हे पाकचे हात बळकट करताय’ शिवसेनेनंही भाजप सरकारची पाठराखण केलीये. सर्जिकल स्ट्राईकवर असे विधान करणे हे राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवण्यासारखे आहे. सर्जिकल स्ट्राईक झाले आहे. पाकिस्तान पुरावे मागत आहे. पण आपले राजकारणीच बेछुट वक्तव्य करुन पाकिस्तानचे हात बळकट करत आहे. आपल्या राजकारण्याची असे कोणतेही वक्तव्य करू नये .सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त केल्यास त्याचा सैन्याच्या मनोबलावर विपरीत परिणाम होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv