26 मार्च : शक्ती मिल फोटो जर्नालिस्ट सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 376 ई बाबत हायकोर्टात सुनावणी सुरू असल्याने शिक्षेबाबतची सुनावणी उद्या गुरूवारी होणार आहे. त्यामुळे सेशन्स कोर्टाने बलात्कार प्रकरणी सुनावणी पुढे ढकलावी असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत.
मुंबई सेशन कोर्टाने निकालाबाबतची प्रक्रिया एक दिवस थांबवावी असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या न्या. महेश पाटील,न्या. अभय टिपसे आणि न्या.नरेश पाटील खंडपीठानी दिला आहे. मुंबईतील महालक्ष्मी इथं शक्ती मिलमध्ये मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात फोटोजर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणामध्ये 4 आरोपीना दोषी ठरवलंय.
सरकारी पक्षाने या प्रकरणात 376 इ हे कलम लावलं आहे. त्याविरोधात दोषी ठरलेल्या गुन्हेगारांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याच मिलमध्ये टेलिफोन ऑपरेटवर सामूहिक बलात्कार प्रकरणी याच आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 376 ई कलमानुसार या आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते त्यामुळे उद्या कोर्ट या नराधमांना जन्मठेपेची शिक्षा देते की फाशीची शिक्षा याकडे लक्ष्य लागून आहे.