03 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलाय. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवलाय. त्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आता आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. जे आरोप होत आहे ते खोटे असून त्याचा रागही येतो आणि संतापही होतो. पण मनसेवाल्यांचे आरोप हे नैराश्यातून आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असा प्रत्युत्तर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलंय. तसंच आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना ‘गेट वेल सून’ असा खोचक टोलाही लगावलाय.
‘राज ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला’ या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली इथं झालेल्या सभेत ‘घरच्या गोष्टी’ जाहीर केल्या. उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना दिवसभर सोबत होतो. हॉस्पिटल ते मातोश्री एकाच गाडीत बसून गेलो. मग तेव्हा नाही वाटलं का पाठीत खंजीर खुपसला ? बाळासाहेब कोमात जाईपर्यंत मी सूप पाठवतो होतो आणि ते घेत होते. ज्या राजाने सूप पाठवलं मग त्यांना कधी नाही वाटलं का पाठीत खंजीर खुपसलं ? अनेकदा बाळासाहेबांशी फोनवर चर्चा केली. तेव्हा नाही वाटलं का ?, पाठीत खंजीर खुपसला ? असा खडा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी कितीही टीका केली तरी त्याला उत्तर देणार नाही असं जाहीर केलंय.
पण राज आणि उद्धव यांच्या वाक्युद्धाचे पडसाद आज उमटले. मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर आणि सेनेचे उमेदवार अरविंद सावंत अर्ज दाखल करण्यासाठी ओल्ड कस्टम हाऊस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले असते शिवसैनिक आणि मनसेसैनिक आमने-सामने आले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि जोरदार घोषणाबाजी झाली त्यांचं रुपांतर हाणामारीत झालं.
यावर उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. नेहमी उमेदवार जेव्हा अर्ज भरण्यासाठी येतो तेव्हा त्यांच्याकडे पेढे, गुलाल असतो. पण मनसेचा उमेदवार जर अर्ज भरण्यासाठी आला होता. तेव्हा त्यांच्या गाडीत सोड्याच्या बॉटल होत्या. मनसेचा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसंच राज ठाकरे यांनी केले आरोप अत्यंत खोटे असून त्यामुळे रागही येतो आणि संतापही होतो. पण राज ठाकरे यांचे आरोप हे केवळ नैराश्यातून आहे. त्यांना आपला पराभव दिसत आहे. त्यामुळे ते असं बोलतं आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. आता त्यांना योगाची गरज आहे की नाही ते त्यांना माहित पण त्यांना गेट वेल सून असा टोलाही आदित्य यांनी लगावला.
मनसेचा हा पूर्वनियोजित हल्ला -आदित्य ठाकरे मनसेनंच अर्ज भरताना दगडफेक केली, सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या. मनसेच्या गुंडांनी आमच्या उमेदवारावर पूर्वनियोजित हल्ला केला. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरच कारवाई केली. मनसेचा दक्षिण मुंबईचा उमेदवार कधीही जिंकणार नाही. निवडणूक आयोगाने पोलिसांवर आणि मनसेच्या गुंडांवरही कारवाई करावी.