25 सप्टेंबर : नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी दूर झाली असल्याचं स्पष्ट झालंय. आज एकाच मंचावर येऊन अडवाणींनी ‘नमो नमो’ जप केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप नक्की जिंकेल, असा विश्वास लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला. काँग्रेस सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता वैतागलीय. या सरकारला निवडणुकीत जागा दाखवण्याची वेळ आलीय. यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे. जनतेची सेवा असो अथवा नेतृत्त्व या कोणत्याही बाबतीत देशातला इतर कोणताही पक्ष भाजपशी बरोबरी करू शकत नाही असा दावाही अडवाणी केला. भाजपचा महाकुंभ कार्यकर्ता मेळावा भोपाळमध्ये सुरू आहे. त्याचनिमित्तानं अडवाणी, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अन्य प्रमुख नेते व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी नरेंद्र मोदींनी अडवाणींच्या पाय पडण्यासाठी खाली वाकले असता अडवाणींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आशीर्वाद देण्याचं टाळलं. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या वादानंतर मोदी आणि अडवाणी एकाच व्यासपीठावर आलेत. अडवाणींनी यावेळी मोदींची स्तुती केली. या अगोदरही मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीनंतर अडवाणींनी छत्तीसगढमध्ये झालेल्या रॅलीत मोदींच्या कामाची प्रशंसा केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.