04 डिसेंबर : गोव्यात टोल नाक्याच्या तोडफोड प्रकरणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी आज पेडणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. मंगळवारी रात्री उशिरा नितेश राणे यांच्यासह 9 कार्यकर्त्यांपैकी इतर 5 जणांना काही अटींवर जामीन देण्यात आला. पण पुढचे तीन दिवस नितेश राणेंना पेडणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. त्यानुसार नितेश राणे पेडणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरीसाठी दाखल झाले, यावेळी त्यांच्यासोबत खासदार निलेश राणेही उपस्थित होते. दरम्यान, इतर पाच जणांना आज म्हापसा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकेचे पडसाद नवी मुंबईतही उमटले. अटकेचा निषेध म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळंबोली जवळ एका गाडीची तोडफोड केली, तर कर्नाळ्यामध्ये एका हॉटेलजवळ थांबलेल्या 3 गाड्यांच्या काचा फोडल्या. या प्रकरणी 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. पनवेल पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.