19 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आपल्या मुलीसाठी वडिलांना याची किंमत मोजावी लागली आहे. विजयकुमार गावित यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलीय. गावितांचा पदभार काढून घेतलाय.
आज संध्याकाळी गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीच्या सुरुवातीलाच गावितांच्या हकालपट्टीचं पत्र राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिलं. मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टीचं पत्र राज्यपालांकडे ताबडतोब पाठवलं आहे. मंत्रिमंडळातून हकालपट्टी बरोबरच गावितांची लवकरच पक्षातूनही काढलं जाण्याची शक्यता आहे.
हीना गावितांना भाजपनं तिकीट दिल्यास गावितांची हकालपट्टी करु असा इशारा अजित पवारांनी दिला होता. तरीही हीना गावित यांच्या भाजप प्रवेशाचं डॉ. विजयकुमार गावितांनी समर्थन केलं होतं. अखेर आज गावितांच्या कन्येनं भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीने कारवाईचा बडगा उगारलाय. विशेष म्हणजे, विजयकुमार गावीत यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. शासकीय योजनांच्या गैरव्यवहाराचे ठपके त्यांच्यावर आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे आदेश न्यायालयानं दिले आहे. मात्र, मंत्रीपदाच्या कवचकुंचलामुळे त्यांना आतापर्यंत संरक्षण मिळालं होतं. गावितांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी * नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून - 2001 मध्ये पहिली याचिका दाखल - शासकीय योजनांमध्ये बनावट लाभार्थी - सरकारी अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल * आदिवासी विकास मंत्री म्हणून - 2009 पासून याचिका दाखल - आश्रमशाळांमधील साहित्याची खरेदी - आदिवासी कल्याणाच्या योजना - यातील गैरव्यवहार - सीबआय चौकशी पूर्ण * वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून - वैद्यकीय साधनांच्या खरेदीतील गैरव्यवहराच्या तक्रारी