25 सप्टेंबर : आगामी निवडणूक काँग्रेस लढणार नसून सीबीआय लढणार आहे. काँग्रेसमध्ये निवडणूक लढण्याची ताकद राहिली नाहीय म्हणून त्यांनी सीबीआयला पुढं केलं आहे. आणि काँग्रेसचे नेत्यांनी हे लक्षात घ्यावं की, तुम्ही आणि सीबीआय देशावर अन्याय करत आहात तुम्हाला देशाची ही जनता माफ करणार नाही अशी घणाघाती टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केली. तसंच महात्मा गांधी यांची अखेरची इच्छा होती की, काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यात यावा पण काँग्रेसच्या नेत्यांनी गांधींची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे आता गांधींचीही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आली असून आता काँग्रेसमुक्त भारत करण्याची वेळ आली आहे अशी तोफही मोदींनी काँग्रेसवर डागली. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशमध्ये भाजपच्या प्रचारसभेचं नारळ फोडलं. भाजपचा महाकुंभ कार्यकर्ता मेळावा भोपाळमध्ये झाला. त्यानिमित्तानं लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आगामी लोकसभा निवडणूक नक्की जिंकेल, असा विश्वास यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.