24 डिसेंबर : दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता आहे ती ‘आप’च्या मंत्रिमंडळाची. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही नावांवर आता शिक्कामोर्तब झालंय. त्यातलं पहिलं नाव आहे मनिष सिसोदिया यांच. पटपडगंजमधून निवडून आलेले मनिष सिसोदिया पत्रकार आहेत. शिवाय माहित अधिकार कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. मालवीय नगरमधून आमदार असलेले सोमनाथ भारती हे सुद्धा या मंत्रिमंडळात असतील. ते आयआयटी पदवीधर आहेत. पत्रकार राखी बिर्ला यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्या मंगलोरपुरी भागातून निवडून आल्या आहेत. ग्रेटर कैलाशमधून निवडून आलेले इंजिनीअर आणि एलएलबी पदवीधर असलेले सौरभ भारद्वाज, शाकूर बस्तीमधून निवडणूक जिंकलेले सत्येंद्र जैन, मदीपूरमधून आलेले गिरीश सोनी या सर्वांना मंत्रीपद मिळणार आहे.
मूळ काँग्रेसचे असलेले आणि नंतर इंडिया अगेन्स्ट करप्शनमधून आम आदमी पक्षात आलेले विनोद कुमार बिन्नी यांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल. पण, त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नाही.
दिल्लीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारत आम आदमी पार्टीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 26 डिसेंबरला रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.