20 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चढाओढीत गेल्या 6 महिन्यांपासून मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह बढतीच्या प्रतिक्षेत आहेत. याचाच अर्थ तेव्हापासून नव्या पोलीस आयुक्ताची नियुक्ती रखडलेली आहे.
गेल्या एप्रिलमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले सत्यपाल सिंह यांची महासंचालकपदी बढती व्हायला हवी होती. पण त्यांच्या जागी पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लावायची या वरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा पेच निर्माण झालाय. हा पेच केवळ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निर्माण केला गेलाय.
मुंबई पोलीस आयुक्तपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मर्जीतल्या राकेश मारिया यांची निवड व्हावी असा गृहमंत्री आर.आर.पाटलांचा प्रयत्न चाललाय. पण त्याला काँग्रेसचा विरोध आहे.
मुंबईतल्या लोकसभेच्या पाच जागा काँग्रेसकडे असल्यानं मुख्यमंत्र्यांना आपल्या मर्जीतला पोलीस आयुक्त हवाय. त्यासाठी जावेद अहमद आणि विजय कांबळे यांची नावं काँग्रेसकडून पुढे केली जात आहे. विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे.