07 सप्टेंबर : अॅट्रॉसिटी कायद्यावर भाष्य करुन यु टर्न घेणाऱ्या शरद पवारांना खासदार उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. जनतेमुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे जनता नाही हे लक्षात ठेवा, असं म्हणत उदयनराजे भोसलेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तसंच, डोक्यावर घेणारी जनता कधी पायाखाली घेईल सांगता येत नाही, असा इशारा उदयनराजे यांनी पवारांना दिला आहे.
अॅट्रॉसिटीच्या 90 टक्के गुन्हे हे बोगस असतात. त्यामुळे या कायद्यात बदल न करता, तो रद्दच करायला हवा. शरद पवार यांनी अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचा सल्ला दिला यावर तुम्हाला काय वाटते असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच उदयनराजे म्हणाले, ‘कोण काय म्हणतयं याविषयी मला काहीही म्हणायचं नाही’, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचे नाव घेण्याचं टाळलं. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही उदयनराजे भोसलेंनी केली. 11 तारखेला साताऱ्यात होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चात उदयनराजे भोसले सहभागी होणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv