09 डिसेंबर : दिल्लीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पराभवचं खापर पक्षावर फोडलंय. पक्ष संघटनेकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही असा आरोप करत शीला दीक्षित यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिलाय. तसंच पक्ष आणि दिल्ली सरकार यांच्यातही दरी असल्याचं त्यांनी म्हटलं.आयबीएन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत दीक्षित यांनी हे आरोप केलेत.
दीक्षित म्हणाल्यात, केजरीवाल यांच्या ताकदीला आपण कमी लेखलं. पण, आम आदमी पक्षावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे मतदारांनीही दुर्लक्ष केलंय. रामलीलावर विधिमंडळ अधिवेशन भरवण्यासारखी केजरीवाल यांनी दिलेली आश्वासनं ही घटनाबाह्य असल्याचा आरोप ही दीक्षित यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. दिल्लीत काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तब्बल 15 वर्ष मुख्यमंत्रीपद भुषवणार्या शीला दीक्षित यांचा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तब्बल 25 हजार मतांनी पराभव केला.
हा पराभव दीक्षित यांच्या चांगल्याच जिव्हारी लागला. 8 हजारांवर पिछाडीवर असतानाच दीक्षित यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारच राजीनामा दिली होता. संध्याकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी शीला दीक्षित यांनी उत्तम काम केले अशी पावती राहुल यांनी दिली होती. मात्र आज दीक्षित राहुल यांची पावती ‘टराटरा’ फाडून पक्षावर निशणा साधला.