मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /शक्ती मिल गँगरेप प्रकरणाचा आज फैसला

शक्ती मिल गँगरेप प्रकरणाचा आज फैसला

  सुधाकर काश्यप, मुंबई

  21 मार्च : मुंबईमध्ये शक्ती मिलमध्ये एका फोटोजर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्काराने मुंबई हादरून गेली होती. याप्रकरणाच्या तपासात, याच आरोपींनी शक्ती मिलच्या कपाऊंडमध्ये त्याआधीही आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचं उघड झालं होतं. मुंबईसह देशभरात याप्रकरणावर संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर तब्बल सात महिन्यात या खटल्याचा निकाल आला. काल आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. आज या प्रकरणाचा फैसला होणार आहे.

  स्थळ : मुंबईतल्या महालक्ष्मी इथली पडिक शक्ती मिल. तारीख : 22 ऑगस्ट 2013, वेळ संध्याकाळी 5: 20 ची. एका फोटोजर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. त्यातच भर म्हणजे याच ठिकाणी एका टेलिफोन ऑपरेटर मुलीवरही सामूहिक बलात्कार झाल्याचं नंतर उघड झालं. या दोन्ही प्रकरणात मुंबई सेशन्स कोर्टाने निकाल दिलाय. दोन्ही खटल्यात मिळून 5 आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलंय. यामधले विजय जाधव, मोहम्मह कासीम आणि मोहम्मद सलीम हे तीन आरोपी या दोन्ही घटनांमध्ये दोषी आहेत.

  शक्ती मिलमध्ये झालेल्या या बलात्कार प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पोलिसांच्या विरोधात अनेक मोर्चेही निघाले होते. पण पोलिसांनी वेगाने तपास करून या दोन्ही प्रकरणांचा छडा लावला आणि आरोपींना तात्काळ अटक केली.

  आज या दोन्ही प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींच्या शिक्षेबद्दल सुनावणी होणार आहे. हा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्ट काय शिक्षा सुनावतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या प्रकरणातल्या दोन अल्पवयीन आरोपींचा खटला वेगळा चालवण्यात येणार आहे.

  First published:

  Tags: Mumbai, Photo, Photography, Shakti mill