मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /वादावर आता तरी पडदा पडू द्या -जोशी

वादावर आता तरी पडदा पडू द्या -जोशी

  manhoar joshi29 नोव्हेंबर : शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींना अखेर आपला माफीनामा सादर करावा लागला. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मजबूत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. माननीय पक्षप्रमुखांचा अवमान होईल असे कोणतेही विधान माझ्याकडून अनवधानाने जरी झाले असले तरी पक्षशिस्त म्हणून झाल्या प्रकाराबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि या वादावर आता तरी पडदा पाडावा अशी विनवणी करून पंतांनी आपला माफीनामा सादर केला.

  शिवसेनेत नाराजी नाट्याच्या 'प्रयोग'ला सुरूवात झाली ती. 11 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांच्या प्रकट मुलाखतीमुळे. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. प्रबोधनकारांचं स्मारक बांधायचं असतं तर बाळासाहेबांनी सरकार पाडून दाखवलं असतं. आणि स्मारक उभारलं असतं. पण उद्धव यांच्या नेतृत्वात कणखरपणा नाही अशी टीका जोशी यांनी केली होती. जोशी सरांच्या विधानामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली.

  मात्र उद्धव यांनी यावर भाष्य न करता शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात सरांना चांगलाच धडा शिकवला. दसरा मेळाव्यात शिवसैनिकांनी 'चले जाव' च्या घोषणाबाजी करून जोशी सरांना अपमानीत होऊन व्यासपीठावरुन खाली उतरावे लागले होते. हे घडल्यानंतरही मेळाव्यात घडलेल्या प्रकारामागे उद्धव ठाकरेंचा हात होता असा आरोपही जोशी सरांनी केला होता. एवढंच नाही तर आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत जोशी यांनी उद्धव यांनी जरी आपल्याला बोलावले नाही तरी मी मातोश्रीवर जाईल असं सांगितलं होतं. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी याला उत्तर दिले नाही.

  मध्यंतरी शिवसेनेचं मुखपृष्ठ 'सामना'तून 'कर्म करा, फळाची चिंता करु नका' असा सल्ला जोशींना देण्यात आला होता. अखेरीस आज शुक्रवारी मातोश्रीवर या 'नाराजी' नाट्यावर बैठक झाली. यावेळी उद्धव यांनी कडक भूमिका घेत जे नाराज आहे, ज्यांना पक्षनेतृत्वावर विश्वास नसेल तर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडावे असा इशारा दिला. उद्धव यांनी जोशी यांचं नाव न घेता हा इशारा दिला. तसंच यावेळी मनोहर जोशींनी माफीनामा सादर करावा, असा निर्णय बैठकीत झाला. त्यानंतर दीड तासांनी मनोहर जोशींनी माफीनामा सादर केला. पक्षप्रमुखांचा अवमान होईल असं वक्तव्य आपण केलं असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असं जोशींनी आपल्या पत्रात लिहिलंय. एकंदरीतच उद्धव यांच्या ठाकरी बाण्यापुढे जोशी सरांसारख्या ज्येष्ठ नेत्याला माफीनामा सादर केल्यामुळे इतर नाराज बंडोबांही चांगलीच धास्ती घेतलीय.

  जोशी सरांचा माफीनामा

  "शिवसेनेत सर्वाधिक महत्त्व निष्ठेला आणि शिस्तीला आहे. लाखो शिवसैनिकांप्रमाणेच माझी शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा आहे. या निष्ठांचे पालन मी 45 वर्षं केले आहे. दि.11 ऑक्टोबर 2013 रोजी दादरच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवातील एका कार्यक्रमात माझी जाहीर मुलाखत घेण्यात आली व बाळासाहेबांच्या स्मारकावरून विचारलेल्या प्रश्नांवरून माझी विधाने वादाच्या भोवर्‍यात सापडली.

  हे सर्व गैरसमजातून घडले असले तरी झाला प्रकार मला तसेच पक्षाला मनस्ताप देणारा ठरला. अनेकदा खुलासे करूनही संभ्रमाचे वातावरण कायम राहिल्याने मी आज दि.29-11-2013 रोजी 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते. माझ्या विधानांवरून उद्भवलेल्या वातावरणावर तेथे परखड चर्चा झाली.

  मी या बैठकीत असे स्पष्ट केले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मजबूत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. शिवसेना पक्षप्रमुखांचे नेतृत्व व त्यांचा आदेश माझ्यासाठी नेहमीच शिरसावंद्य आहे. माननीय पक्षप्रमुखांचा अवमान होईल असे कोणतेही विधान माझ्याकडून अनवधानाने जरी झाले असले तरी पक्षशिस्त म्हणून झाल्या प्रकाराबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि या वादावर आता तरी पडदा पडेल, अशी अपेक्षा करतो."

  आपला नम्र,

  मनोहर जोशी

  First published:

  Tags: Shiv sena, Shiv sena dasara melava, Udhav thakare, उद्धव ठाकरे, दसरा मेळावा, बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, माफीनामा, शिवसेना