11 फेब्रुवारी : राज्यभरात 12 तारखेला होणार्या रास्तारोको आंदोलन करणारे आणि सरकारमध्ये हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असं आव्हान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातल्या सभेत दिलं होतं. त्यावर आधी राज्य सरकारने उत्तर दिल्यानंतर आता शिवसेनेनेही राज यांच्यावर तोफ डागली आहे. ‘राज यांचं हे आव्हान म्हणजे नाटक’ असल्याची जोरदार टीका शिवसेने केली आहे.
‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या अग्रलेखात ही टीका करण्यात आली आहे. शिवसेनेने या अग्रलेखातून, “‘मनसे’प्रमुखांनी अशी गर्जना केली आहे की, ‘१२ तारखेस ते स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. हिंमत असेल तर अटक करा.’ आता यात हिंमतीचा व मर्दानगीचा प्रश्न येतोच कुठे? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘सलीम-जावेद’ने नाटकाचे स्क्रिप्ट असेच लिहिले आहे. त्यानुसार नायकाला अटक करावीच लागेल. गर्जना हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे व ‘अटक’हा क्लायमॅक्स आहे! थोडक्यात काय, तर एकच नाटक नाव बदलून वारंवार रंगमंचावर येत आहे. कारण त्यास लोकाश्रय नसला तरी राजाश्रय लाभला आहे.”
इतकंच नाही, तर राज यांच्या या आव्हानाला राज्य सरकारची फूस असल्याचा आरोपही करण्यात आलं आहे. राज यांनी वर्षभरापूर्वी टोलविरोधी आंदोलन सुरू केलं होतं, त्याचं काय झालं असा सवालही सामनामध्ये विचारण्यात आला आहे.
राज ठाकरेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेत,“आपल्याकडे राजकारण हेही नाटकच आहे. पुण्याच्या एस.पी. मैदानावरूनही रविवारी एका जुन्या नाटकाची घोषणा झाली. जुन्याचं संचात, त्याच नेपथ्यात, त्याच संवादात फक्त ‘नाव’ बदलून हे जुने नाटक रंगमंचावर येत आहे. मनसेप्रमुखांचे आवडते नाटक ‘मला अटक करा हो!’ रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाले असून विंगेतून अजित पवार, आर.आर. पाटील, पृथ्वीराज बाबा यांच्यापैकी एकानं घंटा वाजवताच पडदे सरकून नाटकाला सुरुवात होईल. ‘मला कुणी अटक करील काय?’, ‘आम्ही राडा करतो, तुम्ही अटक करा!’, ‘मला जेलात जाऊ द्या!’, ‘अटक मटक अटकेचे नाटक’, ‘मुझे अटक करो!’. ‘मी अटकराज बोलतोय!’ ‘आधी अटक, मग हळूच सटक’ अशा अनेक नावांवर घोळ सुरू आहे.” असं शिवसेनेने आग्रलेखात म्हटले आहे.

)







