06 मार्च : लग्नात कोट्यवधींचा खर्च करुन लोकप्रतिनिधी लग्नसोहळे उरकत असताना नगरच्या श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी स्वतः सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न लावलं. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी सामाजिक बांधिलकी जपलीय. सामुदायिक विवाह सोहळ्यात रेशीम गाठी बांधून ते विवाहबद्ध झालेत. पिंपळगाव पिसा या गावी सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोहल्यावर चढले. सामुदायिक विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील नऊ वधू वरांचा विवाह पार पडला. सर्वसामान्य परिस्थिती असल्यानं थाटामाटात विवाह सोहळा करता आला नसता. मात्र या सामुदायिक सोहळ्यात स्वप्न साकारल्याचं नवविवाहित वधू वरांनी म्हटलंय.
आमदार राहुल जगताप यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, मधुकरराव पिचड, उद्योजक विठ्ठल मणियार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेक आमदार, खासदारांनी हजेरी लावली. आमदार राहुल जगताप हे कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. लोकप्रतिनिधींचा हाच आदर्श जनतेला अभिप्रेत असतो. त्यामुळे विवाहावर पैशांची उधळपट्टी करुन संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करणार्यांनी जगताप दाम्पत्याकडून बोध घेण्याची गरज आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv