03 जानेवारी : पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तब्बल तीन वर्षांनी ते मीडियाला सामोरे जाणार आहेत. भ्रष्टचार, महागाई अशा विविध प्रश्नांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेले पंतप्रधान मनमोहन सिंग आज आपली बाजू मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता एका इंग्रजी वर्तमानपत्राने वर्तवली होती. त्यामुळे आता जगभरात या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नक्की काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. येत्या 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार, खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंह की ते राहुल गांधींचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करणार? राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल त्यांचं काय मत आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांना आज उत्तर मिळण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची काय भूमिका असेल, याबाबतही पंतप्रधान बोलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विरोधीपक्षांचं टीकास्त्र पंतप्रधान आज तीन वर्षांनी पत्रकार परिषद घेत असल्याने विरोधीपक्षांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. पत्रकार परिषदेचं निमित्तसाधून विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत.
- पंतप्रधानांना काय वाटतं, इतिहास त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाकडे कसं पाहील?
- नरसिंह रावांच्या सरकारमधली त्यांची अर्थमंत्र्यांची भूमिका पंतप्रधानपदापेक्षा जास्त समाधान देणारी होती का?
- या सरकारकडे अत्यंत भ्रष्ट सरकार म्हणून पाहिलं जातंय. पंतप्रधानांना त्यांचं काय चुकलं असं वाटतं?
- देशामध्ये येणारी एकूणच गुंतवणूक कमी झालीय. या सगळ्या आर्थिक बाबींमध्ये काय चुकलं असं पंतप्रधानांना वाटतं?
- मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात सीबीआय, सीव्हीसी, जेपीसी आणि इतर सेवा देणार्या संस्थांचा दर्जा घसरला याची पंतप्रधानांना खंत वाटते का?
पंतप्रधान मनमोहन सिंह यांची आजची पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकींच्या काही महिन्यांपूर्वी का बोलवली असावी याकडे आज सगळ्यांचं लक्ष आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज ते काँग्रेसच्या हिताचा विचार न करता प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाणार आहे.