23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यानिमित्ताने मुंबईतील सोमय्या मैदानावर शिवबंधन आणि प्रतिज्ञा घेण्यासाठी लाखोच्या संख्येनं शिवसैनिक मुंबईतील एकत्र जमले होते.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि या भाषणात बाळासाहेबांची एक ध्वनीफित ऐकवण्यात आली. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली तेव्हा शिवसैनिकांनी ‘परत या परत बाळासाहेब परत या’ या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. पुढच्या क्षणाला बाळासाहेबांनी बोलावं आणि शिवसैनिकांनी ऐकावं असं कधी झालं नाही. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली आणि त्यांच्यापाठोपाठ शिवसैनिकांनी शपथ घेतली..
“मी,माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की, मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन. पद असो, वा नसो मी एक, मी एक निष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेईमानी करणार नाही. शिवसेनाप्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेनं पाळीन. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचं जे स्वप्न आहे ते निष्ठेनं शपथपूर्वक पूर्ण करीन.”