मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /उदयनराजे भोसले युतीच्या वाटेवर ?

उदयनराजे भोसले युतीच्या वाटेवर ?

    udyanraje bhosle मुंबई 17 मे : राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले नाराज असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच त्यांच्या महायुती च्या नेत्यांशी गाठीभेटी सुरू आहेत. सकाळी उदयनराजेंनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे मातोश्रीवर गेले होते. तसंच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीदेखील उदयनराजे भेट घेणार आहेत. दरम्यान, उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं उदयनराजे यांचं म्हणणं आहे.

    राजे का नाराज ?

    मात्र मागिल 20 दिवसांपासून उदयनराजे शिवसेनेच्या संपर्कात आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फोनवरून राजेंशी संपर्कात आहे. या सर्वात गोपीनाथ मुंडे मध्यस्थी करत आहे. युतीच्या नेतृत्वाखाली राजेंनी येणारी लोकसभेची निवडणूक लढवावी असा प्रयत्न केला जात आहे.

    विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आढावा बैठक घेतली तेव्हा उदयनराजे बैठकीला गैरहजर होते. याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना गैरहजेरीच कारण विचारले असता कोणीही ठोस उत्तर दिलं नाही. उदयनराजे यांचा सातार्‍यात मनस्वी पद्धतीने कारभार सुरू असतो.

    यामुळे राष्ट्रवादीचे नेते राजेंशी फटकून राहतात आणि राजे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फटकून राहतात. राजे जरी राष्ट्रवादीचे खासदार असले तरी इतर नेत्यांसोबत फारसं सख्य नव्हतं अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच काही दिवसांपूर्वी रयत शिक्षण संस्थेंचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राजेंनी निमंत्रण देण्यात न आल्यामुळे राजे संतप्त होते.त्यानंतर पुढील हालचाली सुरू झाल्या असं सूत्रांचं म्हणणं आहे.

    युतीची रणनीती ?

    सातार्‍यातून उदयनराजे भोसले यांनी एक तर युतीच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढवावी अन्यथा राजे यांनी अपक्ष म्हणून उभे राहावे. त्यांना युती पाठिंबा देणार आणि राजेंच्या समर्थकांची ताकद युतीच्या इतर उमेदवारांसाठी वापरता यावी अशी प्राथमिक स्तरावर चर्चा युतीत सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत ही सगळी चर्ची झाली होती. त्यानंतर आता स्वत: उदयनराजे भोसले मातोश्रीवर दाखल झाले आहे.

    राष्ट्रवादीची धावाधाव

    उदयनराजे भोसले मातोश्रीवर दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली. खुद्द गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजेंची भेट घेतली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात राजेंशी संवाद साधला असता. मातोश्रीवर भेट ही सदिच्छा होती. यामागे कोणतेही राजकारण नाही असं सांगितलं. मात्र एका प्रकारे राजेंनी राष्ट्रवादीला सरळसरळ आव्हान दिलं आहे.

    First published:

    Tags: NCP, Udyanraje Bhosle