08 डिसेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. आम्ही मवाळ झालेलो नाही, असं सांगतानाच 50 दिवसात सारं काही आलबेल होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. त्यामुळे आम्ही आणखी 20 दिवस वाट पाहणार आहोत, असा सूचक इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपाला दिला.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. केंद्र सरकारने नोटाबंदी केली. दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी ही नोटाबंदी केल्याचं सांगण्यात आले. मग नोटाबंदीनंतर दहशतवाद संपला का? असा सवाल करतानाच नोटाबंदीने दहशतवाद संपवण्याचा नवा मार्ग मोदींनी दाखवला आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांनी नोटबंदी करुन दहशतवाद संपवला पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. सहकारी बँकांवर अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांना नोटाबंदीमुळे त्रास होतोय, आता त्यांच्यावरही इन्कम टॅक्स लावणार का, हे सरकारनं सांगून द्याव, असा चिमटेही त्यांनी काढला आहे.
तसंच काळा पैसा अद्यापही चालूच आहे. नोटाबंदीच्या तयारीत त्रुटी राहिल्याने लोकांना त्रास होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत अर्थतज्ञही साशंक आहेत. एवढचं नाही तर, नोटाबंदीच्या निर्णयामुळे सीमेवर लढणाऱ्या जवानांनाही बँकांबाहेर रांगेत उभं राहावं लागत आहे, ही जवानांची एकप्रकारे थट्टाच असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv








