07 डिसेंबर : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्तला येरवडा तुरुंग प्रशासनानं एक महिन्याचा पॅरोल मंजूर केलाय. संजयची पत्नी मान्यता हिची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरून त्यानं रजेसाठी अर्ज केला होता. तो मंजूरही करण्यात आलाय.
मात्र संजयची पत्नी मान्यता आजारी आहे असं सांगितलं जात असलं तरी नुकत्याच झालेल्या एका फिल्म प्रिमिअरमध्ये ती हजर होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
1993 बॉम्बस्फोट प्रकरणात अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झालीय. संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहे. तुरुंगात दाखल होऊन संजयला सहा पूर्ण झाले त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वैद्यकीय कारणासाठी संजय 14 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर संजयने 14 दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवले मात्र 14 दिवसांची सुट्टी संपत आल्यावर संजयने पुन्हा 14 दिवसांची सुट्टी मागितली आणि तिही मंजूर झाली.
30 ऑक्टोबर रोजी संजय महिन्याभराची सुट्टी संपवून तुरुंगात दाखल झालाय. मात्र एक महिना उलटत नाही तोच संजयला पुन्हा महिन्याभरासाठी सुट्टी मिळालीय. यावेळी संजयची पत्ती मान्यता आजारी असल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, संजय दत्तला पॅरोल मंजूर केल्याचा निषेध करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. पुण्यात येरवडा जेलच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली.