18 फेब्रुवारी : संसदेत प्रचंड गदारोळ, कडेकोट बंदोबस्त, गोंधळ घालणार्या खासदारांना अडवण्यासाठी दार बंद एवढेच नाही तर लोकसभा टीव्हीचे प्रक्षेपणही बंद अशा वातावरणात वादग्रस्त तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. आवाजी मतदान घेऊन तेलंगणा विधेयकाल मंजुरी देण्यात आलीय.
काँग्रेस आणि भाजपने तेलंगणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलंय. त्यामुळे तेलंगणाचा मार्ग मोकळा झालाय. सीमांध्र आणि तेलंगणाची हैदराबाद ही संयुक्त राजधानी असणार आहे. आता तेलंगणा विधेयक गुरुवारी राज्यसभेत चर्चेसाठी सादर करण्यात येणार आहे. मात्र तेलंगणा विधेयक मंजूर करणं राज्यघटनेच्याविरोधात आहे अशी प्रतिक्रिया के.एस.राव यांनी दिली.
तर तेलंगणाचं विधेयक मंजूर होणं ही ऐतिहासिक घटना आहे. लोकसभेचं प्रक्षेपण थांबवणं हा लोकसभेच्या अध्यक्षांचा निर्णय होता अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी दिली. तर देशाच्या इतिहासातला आजचा दिवस काळा दिवस आहे. दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करण्यात आली. आम्हाला लोकसभेत बोलू दिलं नाही, लोकसभा टीव्हीचं प्रक्षेपण बंद करण्यात आलं, दारं बंद करण्यात आली. यानिर्णयाच्या विरोधात उद्या आंध्र बंद पुकारणार असं जगनमोहन रेड्डी यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे तेलंगणा विधेयक मंजूर झाल्यामुळे ‘जय तेलंगणा’ चा जयघोष करत तेलंगणा समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केलाय.
आज दिवसभरात काय घडले ? तेलंगणाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गोंधळात कामकाजाला सुरुवात झाली.त्यामुळे कामकाज सकाळपासून तहकूब करण्यात आलं होतं. दुपारी 3 वाजचा लोकसभेचं कामकाज सुरू झालं. गोंधळातच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेत तेलंगणाचं विधेयक मांडलं. गुरुवारीही प्रचंड गोंधळात सरकारनं लोकसभेत तेलंगणा विधेयक मांडलं होतं. पण इतक्या गोंधळात मांडलेल्या विधेयकाला भाजपनं तांत्रिक कारणावरून विरोध केला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा विधेयक मांडण्यात आलं.
गुरुवारी लोकसभेमध्ये पेपर स्प्रे फवारण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या सुरक्षाविषयक समितीची सोमवारी बैठक झाली. त्यात झालेल्या निर्णयानुसार लोकसभेच्या कामकाजाचे फोटो घेण्यास किंवा व्हिडिओ चित्रीकरण करण्यास खासदारांना मनाई करण्यात आलीये. सभागृहाच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलाय. खबरदारी घेण्यात आली. संसदेत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोकसभा टीव्हीचे प्रक्षेपण बंद ठेवण्यात आलं तर गोंधळ घालणार्या खासदारांना अडवण्यासाठी लोकसभेची दारं बंद करण्यात आली. बंद दाराआड लोकसभेत आवाजी मतदानाने स्वतंत्र तेलंगणा विधेयकावर मोहोर उमटवण्यात आली. तेलंगणाचा घटनाक्रम 1960 - उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची तेलंगणामधल्या विद्यार्थ्यांबरोबर होणार्या भेदभावा विरोधात निदर्शनं 1969 - तेलंगणा प्रजा समितीची स्थापना 1990 - भाजपचं तेलंगणाला स्वतंत्र राज्याच्या दर्जाचं आश्वासन 2001 - के. चंद्रशेखर राव यांच्याकडून तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना 2006 - स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरून टीआरएसकडून आंध्र प्रदेशाच्या आघाडी सरकारचा पाठिंबा मागे नोव्हेंबर 2009 - संसदेत तेलंगणा विधेयक मांडण्यासाठी चंद्रशेखर राव यांचं आमरण उपोषण डिसेंबर 2009 - स्वतंत्र राज्य निर्मितीच्या प्रक्रियेला सुरूवात झाल्याचं तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलं. फेब्रुवारी 2010 - तेलंगणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी श्रीकृष्ण समितीची स्थापन डिसेंबर 2010 - श्रीकृष्ण समितीनं 6 पर्याय सुचवले मार्च 2011 - तेलंगणा समर्थक गटांचा हैद्राबादमध्ये भव्य मोर्चा 2011 - तेलंगणा भागातल्या 100 आमदार आणि खासदारांचा राजीनामा सप्टेंबर 2012 - सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा सामूहिक बंद डिसेंबर 2012 - सर्वपक्षीय बैठकीनंतर गृहमंत्री शिंदेंचं एका महिन्यात तोडगा काढण्याचं आश्वासन 2013 जानेवारी - अंतिम निर्णयाला काही वेळ लागेल- शिंदे 2013 - लोकांना फसवल्याबद्दल चिदंबरम आणि शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याचा आंध्रप्रदेश कोर्टाचा आदेश जुलै 2013 - काँग्रेसने तेलंगणाच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याचं दिग्विजय सिंहांकडून जाहीर जुलै 2013 - तेलंगणावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी काँग्रेसच्या कोअर कमिटीची चर्चा पूर्ण 2013 - CWC कडून स्वतंत्र तेलंगणा राज्याची घोषणा 3 ऑक्टोबर 2013 - कॅबिनेटचा तेलंगणाच्या निर्मितीला हिरवा कंदील 5 डिसेंबर 2013 - कॅबिनेटची 10 जिल्ह्यांसह स्वतंत्र तेलंगणाच्या मसुद्याला संमती 30 जानेवारी 2014- आंध्र प्रदेश विधानसभेनं तेलंगणा विधेयक फेटाळलं 13 फेब्रुवारी 2014 - प्रचंड गदारोळात लोकसभेत तेलंगणा विधेयक सादर 17 फेब्रुवारी 2014 - लोकसभेत तेलंगणा विधेयक मंजूर