नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी फास्टॅग (FASTag ) अनिर्वाय केला आहे. 2021च्या सुरुवातीपासून देशभरामध्ये फास्टॅग लागू करण्यात आला आहे. या फास्टॅगचा वापर न करणाऱ्यांकडून सरकार दुप्पट दंड वसूल करत आहे. पेटीएमपासून (Paytm) ते विविध बँकांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याचदरम्यान एक गोष्ट अशी देखील आहे ज्याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. ज्यावर आताच लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही महत्वाची गोष्ट म्हणजे कार बदलताना किंवा विकताना तुमच्या कारला लावलेला फास्टॅगला कसा डिअॅक्टिव्ह (Deactivate) म्हणजे निष्क्रिय करायचा. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही ही चूक करु नका -
फास्टॅग घेताना त्याला आपण आपल्या वॉलेट किंवा बँक अकाउंटला लिंक करतो. ज्यामुळे टोल भरताना लागणारे पैसे आपोआप तुमच्या अकाउंटमधून कापले जातात. अशामध्ये जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा नवीन कार विकत घेत असाल त्यावेळी जुना फास्टॅग तुम्ही डिअॅक्टीव्ह केला पाहिजे. नाही तर त्या गाडीचा वापर कुणीही केला तर त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमधूनच कट होत राहतील. नोएडाचा रहिवासी अंकितला हिच चूक महागात पडली आहे. त्याने आपली कार विकली आणि कारवर लावलेला फास्टॅग काढून टाकायला तो विसरला. अंकितने ज्याला कार विकली होती त्याचा नंबर देखील त्याच्याकडून हरवला.
सीरियल नंबरची नोंद करुन ठेवा -
अंकितने विकलेल्या कारचा वापर समोरची व्यक्ती करत होती आणि पैसे अंकितच्या अकाउंटमधून कट होत होते. अंकितने जेव्हा फास्टॅग डिअॅक्टिव्ह करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली तेव्हा त्याला कळालं की त्याच्याकडे फास्टॅगमध्ये नोंद केलेला सीरियल नंबर नव्हता. सीरियल नंबर असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही फास्टॅग डिअॅक्टिव्ह करु शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जेवढ्या कार आहेत त्यावर लावलेला फास्टॅगचा सीरियल नंबर तुमच्याकडे नोंद करुन ठेवणे खूप गरजेचे आहे.
हेही वाचा -Alert! बनावट FASTag ची होतेय विक्री; फक्त इथूनच खरेदी करा वैध फास्टॅग
काही कारणास्तव फास्टॅग राहिला तर हे करा -
जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा एक्सचेंजमध्ये देत असाल तर तुम्ही तुमच्या गाडीवरचा फास्टॅग काढून टाकणे योग्य असेल. काही कारणास्तव फास्टॅग राहिला तर त्यासाठी तुम्हाला आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन फास्टॅगच्या टोल फ्री नंबर 1800-120-4210 वर कॉल करावा लागेल. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा फास्टॅग डिअॅक्टिव्ह करु शकता. तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर लिंक येईल जिथे तुम्ही गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, फास्टॅगचा सीरियल नंबर टाकणे अनिर्वाय आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा फास्टॅग डिअॅक्टिव्हेट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Account deactivation, Car, Compulsory, Fastag, India, Paytm, Technology, Toll news