Home /News /national /

वायूसेनेच्या अधिकाऱ्यावर तब्बल 28 गोळ्या झाडल्या, क्रूर यासिन मलिकच्या कुकृत्यांचा पाढा

वायूसेनेच्या अधिकाऱ्यावर तब्बल 28 गोळ्या झाडल्या, क्रूर यासिन मलिकच्या कुकृत्यांचा पाढा

यासिन मलिक टेरर फंडींग प्रकरणात दोषी आढळला आहे. पण त्याने केलेल्या कुकृत्यांचा पाढा खूप मोठा आहे.

    नवी दिल्ली, 25 मे : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या आणि अनेक निष्पाप जीवांची निर्घृणपणे हत्या करणारा फुटीरतावादी नेता यासिन मलिकचा पापाचा घडा अखेर आज भरला. त्याला एनआयएच्या विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने हा खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगर शहरातील घडामोडींना वेग आला आहे. यासिन मलिकच्या घराबाहेर त्याच्या समर्थकांची घोषणाबाजी सुरु आहे. कोर्टात शिक्षा सुनावण्याआधी श्रीनगरमध्ये दगडफेक देखील झाल्याची बातमी समोर आली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून शहरात लक्ष ठेवलं जात आहे. यासिन मलिक टेरर फंडींग प्रकरणात दोषी आढळला आहे. पण त्याने केलेल्या कुकृत्यांचा पाढा खूप मोठा आहे. त्याने 1990 साली इतर दहशतवाद्यांसोबत मिळून वायुसेनेच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यातील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने आज घटनेच्या दिवशी जो थरार घडला त्याबद्दलची माहिती दिली. नेमकं काय घडलं होतं? यासिन मलिकने 1990 साली दहशतवाद्यांसोबत मिळून वायूसेनेच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. या गोळीबारात स्क्वैड्रन लीडर रवी खन्ना यांचा मृत्यू झाला होता. यासिनने त्यांच्या शरीरावर तब्बल 28 गोळ्या झाडल्या होत्या. यासिनने केलेल्या या निर्घृण हत्येमुळे रवी खन्ना यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. रवी खन्ना यांच्या पत्नी आजही त्यांच्या आठणीने व्याकूळ होतात. रवी खन्ना यांच्या पत्नी यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्या पतीची कशाप्रकारे हत्या केली गेली होती याबाबत माहिती दिली. "मी स्वत: जावून बघितलं होतं. माझ्या पतीला 28 गोळ्या लागल्या होत्या. लेफ्टनंट बीआर शर्मा झाडाच्या पाठीमागे जावून जमीनवर पडून राहिले होते त्यामुळे ते वाचले. मी माझ्या घरातून पाहिलं होतं की माझ्या पतीच्या मृतदेहाभोवती नराधम अतिरेक्यांनी घेराव घातला होता आणि ते नाचत होते. मला त्यावेळी महाभारताचा सीन आठवला होता, ज्यावेळी अभिमन्यूची हत्या केल्यानंतर कौरव नाचले होते", असं रवी खन्ना यांच्या पत्नी निर्मला खन्ना यांनी सांगितलं. (काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणाऱ्या यासिन मलिकचा पापाचा घडा भरला, कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा) "माझ्या घराच्या खाली एक रस्ता होता. तिथून जे काही सुरु होतं ते सर्व दिसत होतं. मी जेव्हा तिथे गेली तेव्हा पाहिलं तर ब्रीफकेसवर गोळी लागली होती. मी विचार केला की, गोळी लागल्याने एक जवान खाली पडला तर देशाचं काय होणार. पण तोपर्यंत वायूसेनेच्या गाड्या आलेल्या होत्या. बस पोहोचली होती. पण तोपर्यंत सर्व अतिरेकी पळून गेलेले होते. मी यासिन मलिकला ओळखत नव्हती. पण बीआर शर्मांनी मला सगळं सांगितलं होतं", असं निर्मला खन्ना म्हणाल्या. "मला भारत सरकारने मजबूर केलं आहे. यासिन मलिकने भारतीय सेनेला टार्गेट केलं. त्याने माझ्या पतीसह तीन जणांची हत्या केली. पण सत्ताधाऱ्यांनी तब्बल 32 वर्षे 4 महिने लावून दिले. अजूनही न्याय मिळाला नाही. आरोपी अद्यापही जिवंत आहेत या गोष्टीचा मला त्रास होतोय. खूनच्या बदल्यात खून मिळाला पाहिजे", अशी मागणी त्यांनी केली. पण कोर्टाने यासीनला 10 लाखांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासिन मलिक वयाच्या 17 व्या जेलमध्ये गेला यासिन मलिक याने 1989 मध्ये काश्मीर खोऱ्यात सशस्त्र कट्टरतावादाचं नेतृत्व केलं होतं. त्याचा जन्म 1966 मध्ये झाला होता. तो वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी जेलमध्ये गेला होता. 1980 साली सुरक्षा दलांनी केलेला हिंसाचार पाहिल्यानंतर आपण पहिल्यांदा हत्यार हातात घेतलं होतं, असं यासिन मलिक दावा करायचा. त्याने 1993 साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. यासिन हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष होता.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या