मुंबई, 20 ऑक्टोबर: जगभरात शारीरिक व्याधींनी ग्रस्त असणारे अनेक लोक आहेत. काही लोक जन्मतः त्यांच्या व्यंगांमुळे किंवा शारीरिक मर्यादांमुळे वेगळे असतात. काही लोकांच्या वैद्यकीय समस्यांमुळे डॉक्टरही अचंबित होतात. अशाच एका विचित्र शारीरिक परिस्थितीसोबत जेसिका मॅनिंग झगडते आहे. आजपर्यंत तिच्या शरीरावर 200 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये हृदय आणि यकृताच्या प्रत्यारोपणाच्या दोन सर्जरींचाही समावेश आहे. तिचं आधीचं हृदय आणि यकृत ती प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून कपाटात ठेवते आणि हृदयरोगापासून स्वतःला दूर ठेवण्याचं आवाहन लोकांना करते. जेसिका मॅनिंग 28 वर्षांची असून ती न्यूझीलंडमध्ये राहते. तिला जन्मतःच हृदयाशी संबंधित आजार आहे. जन्मल्यावर तिचं हृदय अर्धंच विकसित झालं होतं. त्यात एक छिद्र आणि गळणाऱ्या झडपा होत्या. ‘ट्रूली’च्या रिपोर्टनुसार, जेसिकाच्या तिसऱ्या वाढदिवसापर्यंत तिच्यावर 2 ओपन हार्ट शस्त्रक्रिया झाल्या होत्या. यामुळे ती काहीच वर्ष जगू शकेल, असा अंदाज होता. मात्र, आता ती 28 वर्षांची आहे. त्याचवेळी तिच्यावर 200 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील 5 ओपन हार्ट शस्त्रक्रिया आहेत, 2 पेसमेकरसाठीच्या शस्त्रक्रिया आणि एक फुफ्फुसांवरील शस्त्रक्रिया आहे. 25 वर्षांची होईपर्यंत तिच्या हृदय आणि यकृताचं प्रत्यारोपण झालं होतं. आपल्या छातीमध्ये एक मशीन आहे आणि स्वतःच्या हृदयाच्या जागी दुसऱ्याचं हृदय आहे, हा विचारही विचित्र असल्याचं तिनं ‘ट्रुली’शी बोलताना सांगितलं. हेही वाचा - Covid-19 Variant : ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट भारतात दाखल; BF.7 मुळे वाढली चिंता प्रत्यारोपणाच्या या शस्त्रक्रियांसाठी जेसिका जवळपास 53 दिवस रुग्णालयात अतिदक्षता विभागात राहिली. त्यानंतर 14 दिवस वॉर्ड आणि 21 दिवस पुनर्वसन केंद्रात राहिल्यावर मग आता ती सर्वसामान्यांसारखं जगू लागली आहे. तिच्या शरीरावर शस्त्रक्रियेचे अनेक व्रण आहेत. अर्थात याबद्दल तिला वाईट वाटत नाही. शस्त्रक्रियांनंतर तिचं हृदय आणि यकृत विद्यापीठात संशोधनासाठी पाठवण्यात आलं. 10 महिन्यांनंतर ते अवयव पुन्हा तिला मिळाले, तेव्हा तिनं ते घरात ठेवले. ते अवयव प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी ती कपाटात ठेवते. तिचे हे अवयव टिकटॉक व्हिडिओद्वारे दाखवून ती अवयव प्रत्यारोपणाबाबत जगजागृतीही करते. तिचे हे व्हिडिओ खूप पाहिले जातात. अनेक लोक तिच्या धैर्याबद्दल तिचं कौतुकही करतात.
काही लोकांना जन्मतः काही दोष असतात. अशा व्यक्ती बहुतेकवेळा खचून जातात. स्वतःच्या शारीरिक क्षमतांवर मर्यादा आल्यामुळे सामान्यांसारखं जगणं त्यांना शक्य होत नाही. मात्र जेसिकासारख्या मोजक्याच व्यक्ती न डगमगता धैर्यानं अशा गोष्टींचा सामना करतात. पुन्हा उभं राहून इतरांनाही जगण्याचं बळ देतात.