मराठी बातम्या /बातम्या /देश /

Covid-19 Variant : ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट भारतात दाखल; BF.7 मुळे वाढली चिंता

Covid-19 Variant : ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट भारतात दाखल; BF.7 मुळे वाढली चिंता

कोरोना व्हेरिएंट

कोरोना व्हेरिएंट

नवीन व्हेरियंटची संक्रमण क्षमता अधिक असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 ऑक्टोबर :  जवळपास गेल्या अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या विविध लाटांमध्ये आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची तीव्रता वाढल्यानंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांची वाताहतही झाली. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केल्यानंतर मध्यंतरी कोरोना आजाराची तीव्रता कमी झाली होती. आता कोरोना महामारी जवळपास संपल्यात जमा आहे, असा समज नागरिकांनी करून घेतला होता. भारतामध्ये तर आता कोरोनाचे नियमही पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहेत. या दरम्यान, कोरोनाने आता पुन्हा एकदा 'कमबॅक' केलं आहे. भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहेत. हे दोन्ही व्हेरियंट ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंटच आहेत. BA.5.1.7 आणि BF.7 अशी नावं या सब-व्हेरियंटना देण्यात आली आहेत. या नवीन व्हेरियंटची संक्रमण क्षमता अधिक असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

असा आहे ओमिक्रॉन BF.7

BF. 7 सब-व्हेरियंट 'ओमिक्रोन स्पॉन' नावानंही ओळखला जात आहे. हा नॉर्थवेस्ट चीनमधील मंगोलिया या स्वायत्त प्रदेशात सर्वप्रथम आढळला होता. चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी हाच व्हेरियंट जबाबदार ठरत आहे. हा सब-व्हेरियंट खूप वेगाने पसरत असून, यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममध्येदेखील याचे रुग्ण आढळले आहेत. भारतातही ओमिक्रॉन BF. 7 चा रुग्ण आढळला आहे. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये हा रुग्ण आढळला. अशा परिस्थितीत सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

ओमिक्रॉन BF.7 ची लक्षणं

सतत खोकला येणं, ऐकू न येणं, छातीत दुखणं, शरीर थरथर कापणं, वास घेण्याची क्षमता नाहीशी होणं, ही ओमिक्रॉन BF.7 ची सामन्य लक्षणं आहेत. तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉन आणि त्याच्या सब-व्हेरियंटची लक्षणं अतिशय सौम्य आहेत. नागरिकांनी एकदम घाबरण्याची गरज नाही. पण, हार्ट डिसीज, किडनीचे आजार आणि यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्यांमध्ये ही लक्षणं गंभीर स्वरुपात दिसू शकतात. ओमिक्रॉन BF.7 हा व्हेरियंट लवकरच आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्हेरियंटची जागा घेईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Breast Cancer : फक्त 1 रुपयात ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार; भारतीय डॉक्टरांनी केली कमाल

इतर व्हेरियंटच्या तुलनेत BA.5.1.7 आणि BF.7ची संक्रमण क्षमता जास्त

ओमिक्रॉनच्या दोन्ही सब-व्हेरियंटचा संसर्ग दर खूप जास्त आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे नवीन प्रकार एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती सहजपणे कमी करू शकतात. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांनादेखील याचा संसर्ग होऊ शकतो. या व्हेरियंट्सचे केवळ काही विषाणूजन्य कण एखाद्या व्यक्तीला संक्रमित करण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणजेच इतर सर्व व्हेरियंटच्या तुलनेत, या सब-व्हेरियंटच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला लवकर संसर्ग होऊ शकतो.

सब-व्हेरियंट ठरणार चिंतेचं कारण?

ओमिक्रॉनचे हे सब-व्हेरियंट या पूर्वीचा संसर्ग किंवा व्हॅक्सिनेशनमुळे तयार झालेल्या अँटिबॉडीजवर सहज मात करू शकतात. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा म्हणाले, ‘ येणारे दोन ते तीन आठवडे महत्त्वाचे असतील. कोविड-19 अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. जगाच्या विविध भागांमध्ये त्याची नवीन रूपं उदयास येत आहेत. आपण यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे सणासुदीच्या काळात तुम्ही सतर्क राहणं आणि आवश्यक ती सर्व खबरदारी पाळणं गरजेचं आहे.’

नवीन व्हेरियंट आणि सब-व्हेरियंटमुळे, कोविड-19ची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये याची गंभीर लक्षणं दिसून येतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सणासुदीच्या काळात बहुतेक लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. तिथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम अजिबात पाळले जात नाहीत. लोक मास्क न वापरता बाहेर पडत आहेत. त्यामुळे या काळात कोविडची प्रकरणं झपाट्यानं वाढतात. हे टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत. मार्केटमध्ये अवास्तव गर्दी करू नये.

First published:

Tags: Covid-19