नवी दिल्ली 14 मार्च : अमेरिकी पिझ्झा कंपनीला (American Pizza Company) चुकीची डिलिव्हरी पोहोच करणं चांगलंच महागात पडलं आहे. या गोष्टीनंतर महिलेनं कंपनीकडे थेट एक कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या महिलेनं व्हेज पिझ्झा (Veg Pizza) ऑर्डर केला होता, मात्र याजागी चुकून नॉन व्हेज पिझ्झा (Non-Veg Pizza) पाठवला गेला. या गोष्टीमुळे महिलेचा राग इतका अनावर झाला, की तिनं थेट ग्राहक मंचाचे (Consumer Forum) दरवाजे ठोठावले. आता महिलेनं कंपनीकडे 1 कोटी भरपाईची (Compensation) मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील दिपाली त्यागी यांनी 21 मार्च 2019 रोजी एका अमेरिकी पिझ्झा रेस्टॉरंटमधून व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र, कंपनीनं त्यांच्या घरी जो पिझ्झा पाठवला तो नॉनव्हेज होता. दिपालीनं याप्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. दिपालीचं असं म्हणणं आहे, की कौटुंबीक आणि धार्मिक गोष्टींचं पालन करणारी आहे. याशिवाय ती पूर्णपणे शाकाहारी आहे. दिपालीनं सांगितलं, की 2019 मध्ये तिनं होळीच्या दिवशी पिझ्झा ऑर्डर केला होता. त्या म्हणाल्या, की होळीच्या इतक्या शुभ दिवशी पिझ्झा कंपनीनं केलेल्या या गोष्टीमुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांनी सांगितलं, की होळीच्या दिवशी आम्ही सगळे पिझ्झा खायला बसलो आणि पहिला घास खाताच आम्हाला समजलं, की हा नॉनव्हेज पिझ्झा आहे. त्यांनी मशरुम पिझ्झा ऑर्डर केला होता, मात्र जो पिझ्झा पोहोचवला गेला त्यात मांसाचे तुकडे होते. महिलेच्या वकील फरहत वारसी यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करताना म्हटलं, की याबाबत महिलेनं पिझ्झा कंपनीकडे तक्रार केली होती, मात्र कंपनीनं या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. 26 मार्च 2019 ला कंपनीच्या मॅनेजरनं त्यांना फोन केला आणि संपूर्ण कुटुंबाला मोफत व्हेज पिझ्झा देण्याची ऑफर दिली. यावर दिपाली म्हणाल्या, की ही साधारण घटना नाही. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.