कोलकाता 14 फेब्रुवारी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (West Bengal CM) ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये (Nandigram) रविवारी 2007 मध्ये पोलिसांच्या गोळीबारात मारले गेलेल्या आंदोलनकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्या म्हणाल्या, की मी वीरमरण आलेल्यांच्या सन्मानासाठी 'बंगाल विरोधी' ताकदीविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. बॅनर्जी आपले माजी सहयोगी आणि भाजपचे उमेदवार शुभेंदू (Suvendu Adhikari) यांच्याविरोधात नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शेतकरी हा पश्चिम बंगालचा अभिमान आहे आणि त्यांच्या विकासासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे, असं ममता यावेळी बोलताना म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी ट्वीट केलं की, '2007 मध्ये आजच्याच दिवशी नंदीग्राममध्ये निष्पाप ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. अनेक लोकांचे मृतदेहही सापडले नाहीत. राज्याच्या इतिहासातील हा एक काळा धडा आहे. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांना मनापासून श्रद्धांजली. तृणमूल काँग्रेस 14 मार्च हा नंदीग्राम दिन म्हणून साजरा करतो. भूसंपादनविरोधी चळवळी दरम्यान २००७ मध्ये पोलीस गोळीबारात ठार झालेल्यांच्या सन्मानार्थ पक्ष हा दिवस साजरा करतो. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला होता. यानंतर कोलकाता उच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वत: दखल घेत सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते.
ममता यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं, नंदीग्राममध्ये आपला जीव गमावलेल्यांच्या स्मरणार्थ आम्ही 14 मार्च हा शेतकरी दिन म्हणून साजरा करतो आणि शेतकरी पुरस्कार देतो. शेतकरी हा आपला अभिमान आहे आणि आमचे सरकार त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, नंदीग्राममधील शहीदांच्या कुटुंबीयांसोबत काम करणं ही त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
ममता यांनी २००७ मध्ये औद्योगिकरणासाठी शेतजमिनी हडपण्याचा आरोप करत डाव्या आघाडी सरकारविरोधातील आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. याचा चांगलाच फायदा ममता यांच्या पक्षाला झाला होता. 2008 मध्ये 50 टक्के पंचायत जागांवर त्यांच्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. याशिवाय 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही टीएमसीला 19 जागांवर विजय मिळाला होता. यानंतर 2011मध्ये विधानसभा निवडणुकीतही टीएमसीला विजय मिळाला होता. यंदा राज्यातील 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. २७ मार्च ते २९ एप्रिल या काळात निवडणूक पार पडणार आहे. यानंतर दोन मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm west bengal, Mamata banerjee, TMC, Trinamool congress, West Bengal bjp