दिल्ली, 29 मार्च : अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट आलं. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लाखो जणांना आपला जीवही गमवावा लागला आणि कोट्यवधी जणांना त्याचा संसर्ग झाला. अथक प्रयत्न करूनही कोरोनाचा समूळ नायनाट करण्यात यश आलेलं नाही. अधूनमधून कोरोनाचे विविध व्हॅरिएंट्स डोकं वर काढताना दिसतात. भारतामध्येही पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सोमवारी 7.45 टक्के पॉझिटिव्हिटी दरासह 115 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या तीन पटींनी वाढली आहे. ताज्या सरकारी आकडेवारीवरून असं निदर्शनास आलं आहे, की 10 टक्के किंवा त्याहून अधिक वीकली टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (टीपीआर) असलेल्या जिल्ह्यांची संख्या 32पर्यंत वाढली आहे. 14 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन आठवड्यांत झालेली ही 3.5 पट वाढ आहे.
Coronavirus updates : राजधानीत कोरोनाची भीती तर महाराष्ट्रात वाढतोय मृतांचा आकडा
भारतामध्ये अचानक कोविड-19 रुग्णसंख्येत वाढ का होत आहे, यामागे कोणती कारणं आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, XBB.1.16 हा नवीन व्हॅरिएंट रुग्णसंख्येच्या वाढीस कारणीभूत आहे. इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडिअॅट्रिक्सचे माजी संयोजक आणि मंगला हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, बिजनौर येथील कन्सल्टंट पेडिअॅट्रिशन विपीन एम. वशिष्ठ यांनी ट्विट केलं आहे की, "XBB.1.5च्या तुलनेत XBB.1.16ची वाढ होण्याची शक्यता 140 टक्के अधिक आहे. XBB.1.16 हा व्हॅरिएंट XBB.1.5पेक्षा किती तरी अधिक आक्रमक आहे आणि XBB.1.9पेक्षा अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे."
विपिन एम. वशिष्ठ यांनी सांगितलं की, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या माहितीनुसार, "XBB.1.16 वर तीन अतिरिक्त स्पाइक म्युटेशन (E180V, K478R, आणि S486P) आहेत. XBB.1.16 उर्फ #Arcturus हा BA.2.75, BA.5, BQs, XBB.1.5 सारख्या प्रकारांच्या हल्ल्यांचा यशस्वीपणे प्रतिकार करणाऱ्या भारतीयांना त्रस्त करण्यात यशस्वी झाला, तर संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ होईल!!" असंही वशिष्ठ यांनी ट्विटर थ्रेडमध्ये सांगितलं आहे.
ऑनलाईन औषधं मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द
नवीन कोविड व्हॅरिएंटच्या संसर्गाची लक्षणं
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नवीन कोविड रुग्णांमध्ये गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान च्यातिसऱ्या लाटेप्रमाणेच लक्षणं दिसत आहेत. या नवीन व्हॅरिएंटच्या संसर्गानंतर दिसणाऱ्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणं, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा यांचा समावेश होतो. याचा पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही, देशभरातल्या रुग्णालयांमध्ये अद्याप कोविड रुग्णांची गर्दी जाणवत नाही. एकूणच रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. उच्च संसर्ग दर असलेल्या व्हॅरिएंटच्या तीव्रतेचे फारसे पुरावे मिळालेले नाहीत.
संसर्ग कसा टाळावा?
संसर्ग होण्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मूलभूत स्वच्छता उपाययोजनांची मोठी भूमिका असते. गर्दीची ठिकाणं टाळा आणि एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास मास्क वापरा. 60 टक्के अल्कोहोल असलेलं हँड सॅनिटायझर जवळ ठेवा आणि वेळोवेळी त्याचा वापर करा. आपले हात साबण आणि पाण्यानं धुवा, विशेषत: जेवण्यापूर्वी हात स्वच्छ केलेच पाहिजेत. चेहरा, डोळे किंवा नाकाला स्पर्श करणं टाळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Covid19, Vaccinated for covid 19