कोलकाता, 18 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची
(West Bengal Assembly Election 2021) लढाई रोज रंगतदार होत आहे. नंदीग्राम
(Nandigram) मतदार संघातील भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी
(Suvendu Adhikari) यांनी त्यांचे वडील शिशिर अधिकारी
(Sisir Adhikari) 24 मार्च रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला
(PM Narendra Modi rally) उपस्थित राहणार आहेत, अशी घोषणा केली आहे. मोदी यांची 24 तारखेला पूर्व मिदानपूर जिल्ह्यातील कांठीमध्ये सभा आहे. पूर्व मिदानपूर (East Midnapore) हा अधिकारी परिवाराचा जिल्हा आहे. यापूर्वी 21 मार्च रोजी अमित शहा यांच्या सभेतही वडिलांना पाठवणार असल्याच सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केले आहे.
शिशिर अधिकारी हे तृणमुल काँग्रेसचे वरिष्ठ खासदार आणि संस्थापक सदस्य आहेत. त्यांचे सुवेंदू आणि सौमेंदू या दोन मुलांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांचा तिसरा मुलगा दिव्येंदू अधिकारी हा तृणमूल काँग्रेसचा खासदार आहे. 'मोदी यांच्या कांठीमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं आणि मुलाने परवानगी दिली तर मी नक्की उपस्थित राहीन' अशी घोषणा शिशिर अधिकारी यांनी रविवारी केली होती.
भाजपा खासदार लॉकेट चटर्जी यांनी शनिवारी अधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी दुपारचे जेवण एकत्र केले. ही भेट फक्त शिष्टाचारासाठी होती असे स्पष्टीकरण दोन्ही नेत्यांनी दिले आहे. शिशिर अधिकारी यांच्या मुलाने भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. 'आपण तृणमूल काँग्रेसमध्ये आहोत की नाही, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही,' असे शिशिर अधिकारी यांनी यापूर्वी सांगितले होते.
'मी तृणमूलमध्ये आहे हे कुणी सांगितले? तुणमूलनं असं सांगितलं आहे का? सुवेंदू यांनी पक्ष सोडल्यापासून ते माझा परिवार आणि माझ्या पूर्वजांना शिवीगाळ करत आहेत. कोलकाताहून आलेल्या एका व्यक्तीने तर सुवेंदूला मीर जाफर, गद्दार असे म्हंटले, याकडे शिशिर अधिकारी यांनी लक्ष वेधले.
(हे वाचा : ममता दीदींचं व्हील चेअरवर शक्तीप्रदर्शन; 'त्या' घटनेबाबत निवडणूक आयोगाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय )
ममता बॅनर्जीबद्दल ते म्हणाले की, 'सुवेंदूने पक्ष सोडल्यानंतर त्या त्याला हरवण्यासाठी इथे आल्या आहेत. त्या इथे काय करत आहेत. ही नंदीग्रामच्या लोकांसाठी आणि सर्व जिल्ह्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:वर हल्ला झाल्याचे सांगितले होते. काही जणांनी विरोध केला आणि त्यावर त्या म्हणाल्या, मला कारच्या दरवाज्यामुळे दुखापत झाली. त्यांना कसली दुखापत झाली आहे? ते कोणते डॉक्टर आहेत? थोडा धक्का लागला आणि त्यांना प्लॅस्टर आणि व्हिलचेअरवर बसवण्यात आले.' अशी टीका देखील अधिकारी यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.