कोलकाता, 11 मार्च : नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान (Nandigram Election campaign) जखमी झालेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जींनी हॉस्पिटलच्या बेडवरुनच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी (TMC) व्हिडीओ मेसेज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केले आहे. 'आपल्या डोक्यामध्ये आणि पायामध्ये खूप त्रास होत आहे,' असे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
काय म्हणाल्या ममता?
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या (All India Trinamool Congress) ट्विटर हँडलवरुन ममता बॅनर्जी यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये ममता यांनी सांगितले आहे की, 'मी माझ्या बंधू आणि भगिनींना शांत राहण्याचं आवाहन करत आहे. मला काल दुखापत झाली हे खरे आहे. मी काल गाडीच्या बोनेटवर उभे राहून लोकांचे अभिवादन स्वीकारत होते. त्यावेळी मला मागून धक्का बसला आणि मी खाली पडले. त्यामध्ये मला जखम झाली. या घटनेनंतर माझे डोके आणि पाय दुखत आहे.' असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
'यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये गाडीचे चाक माझ्या पायाला लागले. या परिस्थितीमध्ये माझ्याजवळ असलेली औषधं मला देण्यात आली. ती औषधं घेऊन मी तातडीने कोलकाताला रवाना झाले. त्यानंतर माझा उपचार सुरु आहे.'
'व्हिलचेअरवर सभा करेन'
बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ' मी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करत आहे. सामान्य नागरिकांना त्रास होईल किंवा कायदा मोडेल अशी कोणतीही कृती करु नका. येत्या दोन तीन दिवसांमध्ये मी निवडणूक प्रचार सुरु करेन. मला कदाचित पुरुलीयामधील सभा व्हिलचेअरवर करावी लागेल, ती सभा मी व्हिलचेअरवर करेन.' असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.
(वाचा : Mamata Banerjee Health Updates : ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत, श्वास घेण्यासही त्रास )
निवडणूक आयोगाने अहवाल मागितला
निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे. ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारापासून दूर रहाव्या म्हणून हा कट रचण्यात आला, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर याप्रकरणी भाजपाने सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, India, Mamata banerjee, TMC, Trinamool congress, West bengal, West Bengal Election