कोलकाता, 11 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार (West Bengal assembly elections 2021) सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान (Nandigram Election campaign) बुधवारी हल्ला झाला. काही जणांनी ममता बॅनर्जींना धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्यात आला आहे. 'ममतांचा उजवा पाय सूजला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे,' अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाच्या तळव्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. तसंच त्यांच्या पायावर खरचटल्याच्या खुणा आहेत. त्यांच्या उजव्या खांद्यालाही दुखापत झाली आहे. ममतांच्या मनगटाला तसेच त्यांच्या गळ्याला देखील दुखापत झाली आहे. त्यांना पुढील 48 तास हॉस्पिटलमध्येच निगराणीखाली ठेवण्यात येईल अशी माहिती SSKM हॉस्पिटलचे डॉक्टर एम. बदोपाध्य यांनी दिली आहे.
(हे वाचा : नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जीवर हल्ला; पायाला गंभीर दुखापत)
पाच डॉक्टरांची विशेष टीम
ममता बॅनर्जी यांच्या उजव्या पायाचा एक्स-रे करण्यात येईल. तसेच त्यांचा एमआरआय (MRI) देखील करणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या दुखापतीचे निदान झाल्यानंतर पुढील उपचारांबाबत ठरवले जाईल, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. एमआरआय चाचणीनंतर ममता यांना विशेष वॉर्डामध्ये नेण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपचारासाठी पाच सदस्यीय वरिष्ठ डॉक्टरांची विशेष टीम देखील बनवण्यात आली आहे.
राज्यपालांना विरोध
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांनी बुधवारी रात्री ममता बॅनर्जी यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी हॉस्पिटलच्या बाहेर उपस्थित असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करत 'राज्यपाल परत जा' अशी घोषणाबाजी केली. राज्यपालांनी या प्रकरणावर रिपोर्ट सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
(हे वाचा-आग्रा याठिकाणी भीषण अपघात, ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत 8 जण जागीच ठार)
राज्यपालांनी बुधवारी घडलेल्या घटनेनंतर अर्ध्या तासांमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले.राज्यपाल जवळपास अर्धा तास ममता बॅनर्जींच्या खोलीमध्ये होते. यावेळी ममतांनी त्यांना घटनेची माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Attack, Health, India, Mamata banerjee, Wellness, West bengal, West Bengal Election