कोटा, 05 मार्च: रेल्वेतील खाद्यपदार्थात भेसळीच्या अनेक घटना यापूर्वी उघड झाल्या आहे. याचे व्हिडिओही सोशल मीडियात जोरात व्हायरल (Viral Video) झाले आहेत. अशाच प्रकारची रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांना शौचालयातील नळाचं पाणी पाजलं जात (toilet water being used for drink) आहे. एका प्रवाशाने आपल्या मोबाईलने हा व्हिडिओ शुट केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटा रेल्वे विभागातील गरोठ रेल्वे स्थानकात प्रवाशांना शौचालयाच्या नळाचं पाणी पाजलं जात आहे. पश्चिम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शैलेंद्र कुमार सिंह शुक्रवारी दोन दिवसांच्या कोटा रेल्वे बोर्डाच्या दौर्यावर आले आहेत. त्याआधी या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. बर्याच प्रवाशांनी हा व्हिडिओ ट्वीट करून रेल्वेमंत्र्यांकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा वाद वाढत चालल्याचं लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या पॅसेंजर हॉलमधील शौचालयाच्या नळाला हा पाईप लावण्यात आला आहे. या नळाचं पाणी एका लांब पाईपने प्रवाशांना पिण्यासाठी ठेवलेल्या टाकीत सोडण्यात आलं आहे. अनेक प्रवाशांनी या टाकीतून पाणी प्यायलं आहे.
हे ही वाचा -रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट तीन पट महागले, तर मुंबईत... ‘हे’ आहे कारण
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ
कोटा रेल्वे विभागाचं क्षेत्रफळ बरंच मोठं आहे. त्यामुळे येथील रेल्वे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी, पश्चिम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कोटा रेल्वे विभागाच्या दौर्यावर आहेत. असं असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे. या प्रकरणात रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रवाश्यांना पिण्यासाठी ठेवलेल्या टाकीत पाणी सोडण्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. असं असताना या टाकीत शौचालयातील पाईप कशी आली? याचा तपास केला जात आहे.