नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपली आहे. देशभरातील नऊ हजारांपेक्षा जास्त प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) प्रतिनिधी या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. 19 ऑक्टोबर (बुधवार) रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोन उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात एकमेकांविरोधात उभे आहेत. त्यामुळे दोन दशकांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष बनणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांचं पारडं जड वाटत आहे. मात्र, शशी थरूर या निवडणुकीत पराभूत होऊनही इतिहास रचू शकतील! काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नऊ हजार 300 प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांनी सर्व राज्य काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन स्वत:साठी पाठिंबा मागितला आहे. यादरम्यान, थरूर यांनी काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची अनेक महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. थरूर यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. तरीदेखील शशी थरूर पहिल्या रांगेतील नेता म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जर त्यांना 882 पेक्षा जास्त मतं मिळाली तर ते ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शरद पवार यांनाही मागे टाकतील. 2009पासून थरूर यांनी मिळवले सलग विजय शशी थरूर यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना पराभूत करता आलं नाही तरी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या पहिल्या फळीत आपलं स्थान निश्चित केलं आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 66 वर्षीय शशी थरूर यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी सातत्याने निवडणुका जिंकल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा ते खासदार झाले आहेत. तर, खर्गे यांच्याकडे प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मनीष तिवारी यांसारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी खर्गे यांच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. (भारत जोडो यात्रेतील सर्वात खास गिफ्ट; आजी इंदिरा गांधींच्या आठवणीत राहुल गांधी भावुक!) काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात अनेकांची नावं चर्चेत होती. मात्र, शेवटी शशी थरूर एकटेच आव्हान पेलण्यासाठी उभे ठाकले आहेत. अशा स्थितीत पक्षाच्या एकूण नऊ हजार 300 प्रतिनिधींपैकी एक हजार मतेही मिळवण्यात ते यशस्वी ठरले तरी ही ऐतिहासिक कामगिरी मानली जाईल. कारण, या पूर्वी महाराष्ट्रात तीनदा मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यालाही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ 882 मते मिळवण शक्य झालं आहे. या शिवाय या आधी झालेल्या निवडणुकीत राजेश पायलट यांना 354 आणि जितेंद्र प्रसाद यांना 94 मते मिळवता आली होती. त्यामुळे, शशी थरूर या तिन्ही नेत्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्यात यशस्वी ठरले तर राजकीयदृष्ट्या हे मोठं यश मानलं जाईल. (राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ला सोनिया गांधींचीही साथ, पण प्रियंका गांधी नेमक्या कुठे?) शशी थरूर यांना काँग्रेसच्याअंतर्गत राजकीय समीकरणांची चांगलीच जाण आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या उमेदवारीपासूनच आपलं गांधी घराण्याशी काहीही शत्रुत्व नाही, असं स्पष्टीकरण देत आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचे त्यांचे व्हिडिओ संदेश असोत, राजकीय वक्तव्यं असोत किंवा सोशल मीडियावरील पोस्ट्स, प्रत्येक ठिकाणी ते गांधी घराण्याच्या निवडणुकीतील तटस्थतेबद्दलच सकारात्मकपणे बोलले आहेत. याशिवाय त्यांनी नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यातील अंतर कमी करण्याचा संदेशही दिला आहे. खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याशी स्पर्धा करण्यात काय राजकीय आव्हान आहे, याची थरूर यांना कल्पना आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची तिसरी निवडणूक गेल्या तीन दशकांत काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोनदा निवडणूक झाली आहे. त्यामुळे थरूर आणि खर्गे यांच्यात आता तिसरी लढत होत आहे. नरसिंह राव यांच्यानंतर 1997 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. ज्यामध्ये गांधी घराण्यातील कोणीही उमेदवार नव्हता किंवा कुणाला पाठिंबाही दिला नव्हता. 1997च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी, शरद पवार, राजेश पायलट असे दिग्गज नेते उभे होते.
सीताराम केसरी, शरद पवार आणि राजेश पायलट यांच्यात तिरंगी लढत झाली होती. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काही भाग वगळता काँग्रेसच्या सर्व प्रदेश कमिट्यांनी सीताराम केसरी यांना पाठिंबा दिला होता. सीताराम केसरी सहा हजार 224 मते मिळवून विजयी झाले होते. शरद पवार यांना 882 मते मिळाली होती तर, राजेश पायलट यांना 354 मतांवर समाधान मानावे लागले होते. जितेंद्र प्रसादांनी दिलं होतं सोनिया गांधींना आव्हान 1997 नंतर, 2000 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान झालं होतं. तेव्हा सोनिया गांधींना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत सोनिया गांधींना सात हजार 448 मते मिळाली होती. तर, जितेंद्र प्रसाद यांना अवघ्या 94 मतांवर समाधान मानावं लागलं. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष होत्या. डिसेंबर 2017 मध्ये त्यांच्या जागी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे 24 वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. आता मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत होत आहे. गांधी कुटुंबानं कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. मल्लिकार्जुन खर्गेंना गांधी कुटुंबाचा छुपा पाठिंबा? खर्गे यांना गांधी घराण्याचा छुपा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. खर्गे यांची काँग्रेस हायकमांडशी असलेली जवळीकही कोणापासून लपून राहिलेली नाही. स्वत: शशी थरूरही लखनऊमध्ये म्हणाले होते, “खर्गे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. जर ते जिंकले तर आम्ही सर्व त्यांना सहकार्य करू आणि एकत्र काम करू. पक्ष हे आमचे घर आणि कुटुंब आहे.” शशी थरूर यांचा काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांच्या म्हणजेच जी-23च्या यादीत समावेश आहे. अशा परिस्थितीत खर्गे यांचे पारडे स्वाभाविकपणे जड दिसत असले तरी शशी थरूर यांना त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर विजयाची आशा आहे. काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी थरूर यांनी 10 कलमी जाहीरनामा जारी केला आहे. त्यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची थेट भेट घेतलेली आहे. काँग्रेसमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शशी थरूर यांनी स्वत:ला उमेदवार म्हणून सादर करून निवडणूक रंजक बनवली आहे.