भोपाळ,05 ऑगस्ट : जगभरात कोरोनाच्या (Corona pandemic) या संकटानं शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्याचंही भविष्य पणाला लावलं आहे. दहावी, बारावीच्या महत्त्वाच्या वर्षांच्या परीक्षा यंदा रद्द कराव्या लागल्या. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाइन व्यवस्थेशी जुळवून घेत मुलांनी अस्थिर वातावरणात जीव तोडून अभ्यास केला; पण अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि मूल्यमापनाच्या आधारावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल (10th 12th results 2021) जाहीर करण्यात आले. सीबीएसईचा (CBSE) दहावीचा निकालही (10th Result) नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अनेक मुलांनी अत्यंत उत्तम गुण मिळवले. प्रत्यक्ष आयुष्यातही कठीण परीक्षा द्यावी लागलेल्या मुलांचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र हे यश साजरं करण्यासाठी अनेक मुलांबरोबर त्यांचे आई-वडील नव्हते. एनडीटीव्ही डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेत दुनियेनं आश्चर्यानं तोंडात बोटं घालावी असं यश मिळवावं पण ते पहायला, अभिमानानं मिरवायला, कौतुकानं पाठीवर थाप आणि डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणारे लाडके आई-बाबा या जगात नसावेत, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार? असंच दुर्दैव भोपाळच्या वनिषा पाठकच्या (Vanisha Pathak) नशिबी आलं. दहावीच्या परीक्षेत तिनं इंग्लिश, संस्कृत, समाजशास्त्र या विषयांमध्ये 100 पैकी 100 तर गणितात 100 पैकी 97 गुण मिळवले. मात्र तिचे हे यश बघायला तिचे आई-वडील तिच्याबरोबर नव्हते.
हे वाचा - VIDEO: नवी मुंबईत लुटमार, बंदुकीचा धाक दाखवत सोन्याने भरलेली बॅग केली लंपास
मे महिन्यात वनिषानं तिच्या आई आणि वडील दोघांनाही कोरोनामुळे गमावले. वनिषा आणि तिचा 10 वर्षांचा भाऊ विवान दोघंही पोरके झाले. एक हसतं खेळतं चौकोनी कुटुंब एका क्षणात उध्वस्त झालं. त्याही परिस्थितीत वनिषानं आपणच आपल्या धाकट्या भावाचा आधार आहोत हे लक्षात घेतलं आणि स्वतःचे अश्रू थोपवले. तिची दहावीची परीक्षा तोंडावर आली होती, त्याचवेळी झालेला हा आघात मानसिकदृष्ट्या खचवणारा होता. तरीही वनिषानं स्वतःला सावरलं आणि आई-वडिलांचे शेवटचे शब्द लक्षात ठेवत कसून अभ्यास केला. कोवळ्या वयात आई-वडील गमावण्याचे दुःख सोसत परीक्षेला सामोरं जाणं आणि त्यात अव्वल येणं वाटतं तितकं सोपं नाही; पण वनिषानं ते करून दाखवलं कारण तिला आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. वनिषा आणि तिचा भाऊ आता तिच्या मामाकडे डॉ. अशोक कुमार शर्मा आणि मामी डॉ. भावना शर्मा यांच्यासोबत राहतात. ते तिला लढवैयी (Fighter) म्हणतात.
वनिषाचे वडील जितेंद्र कुमार पाठक हे एक आर्थिक सल्लगार होते तर आई डॉ. सीमा पाठक एका सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. दोघांनाही कोरोना झाल्याचं निदान झाल्यानं दवाखान्यात हलवण्यात आलं होतं. दवाखान्यात जाताना वनिषाला तिच्या आईनं सांगितलं होतं की, स्वतःवर विश्वास ठेव, आम्ही लवकरच परत येऊ, तर वडील म्हणाले होते, हिंमत ठेव. आई-वडिलांना तिनं शेवटचं पाहिलं ते तेव्हाच, त्यानंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. तिच्या वडीलांची इच्छा होती की तिनं आयआयटीमध्ये (IIT) जावं किंवा युपीएससी (UPSC) करावं, आता त्यांचे स्वप्न पूर्ण करणं हेचं तिचं ध्येय आहे. वनिषानं आपलं दुःख एका कवितेतून व्यक्त केलं आहे. त्यात ती म्हणते, मी तुमची धीट, खंबीर मुलगी आहे. बाबा, तुमच्याशिवायही... मी अश्रू गाळणार नाही.... ते रोखून ठेवेन...प्रत्येक अश्रूत तुमची आठवण आहे...अशा आशयाची कविता लिहून वनिषानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एका दहावीतल्या मुलीला ध्यानीमनी नसताना अचानक आपले आई-वडील गमवावे लागतात, डोक्यावरचं आई-वडिलांचं प्रेमळ छत्र हरवतं...किती विदीर्ण करणारी ही स्थिती आहे. मात्र या स्थितीतही ही छोटीशी मुलगी आपलं दुःख बाजूला ठेवून आपल्या लहान भावाला सांभाळण्यासाठी खंबीर राहते, आई-वडिलांच्या आठवणी प्रेरणा मानून आयुष्यात पुढं जाण्यासाठी सज्ज होते, हे अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. वनिषा पाठक आज अशा मुलांसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे यात शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News, Corona