हरिद्वार, 15 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या व्यक्तीपुजेचं स्तोम भाजपामध्ये वाढत चाललं आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील भाजपाच्या मंत्र्यांनी मोदी हे शंकराचा अवतार असल्याचं म्हटलं होतं. आता उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी भविष्यात मोदींची श्रीरामासारखी पूजा केली जाईल असा दावा केला आहे. रावत यांनी यावेळी मोदींची तुलना फक्त श्रीरामासोबत नाही, तर श्रीकृष्णासोबतही केली आहे. हरिद्वारमधील एका कार्यक्रमात बोलताना रावत यांनी मोदींच्या स्तुतीच्या मर्यादा पार केल्या. ‘आज मोठ मोठ्या देशांचे अध्यक्ष मोदींना भेटण्यासाठी रांगेत उभे राहतात. ज्या प्रमाणे त्रेता युगात श्रीराम आणि द्वापार युगात श्रीकृष्ण अवतरले होते. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदींचं जनता स्मरण करेल,’ असा दावा रावत यांनी केला. रावत पुढे म्हणाले की, ‘एक वेळ होती जेव्हा भारताच्या राष्ट्रप्रमुखांना विदेशात कुणीही विचारत नसत. आज देशाची परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान मोदी विदेशात जातात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी दुसऱ्या देशांच्या अध्यक्षांची रांग लागते. मोदींनी लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य नागरिकांवर मोठा ठसा उमटवला आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ असं उगाच म्हटलं जात नाही, असं त्यांनी सांगितलं.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकराचा अवतार आहेत, असा दावा हिमाचल प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी केला आहे. ‘शंकराचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी प्रकटले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर निकालापूर्वी मोदी दोन दिवस केदारनाथच्या गुहेत होते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. असा दावा भारद्वाज यांनी केला होता. ( वाचा : VIDEO : भाजपातील अंतर्गत वाद उघड, जिल्हाध्यक्ष आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा! ) भारताने अन्य देशांच्या तुलनेत कोरोना महामारीचा (corona pandemic) सामना चांगला केला आहे. भारतामध्ये विकसित देशांपेक्षा मृत्यूदर कमी आहे. मोदींना शंकराचं वरदान प्राप्त असल्यानेच त्यांनी या संकटाचा चांगल्या पद्धतीने सामना केला. या अनुभवानंतर संपूर्ण जग त्यांच्याकडे नेता म्हणून पाहत आहे, असंही भारद्वाज यांनी म्हटलं होतं.