मुंबई, 14 फेब्रुवारी : उत्तराखंड (Uttarakhand) मधील चमोली (Chamoli) जिल्ह्यात आलेल्या जलप्रयाला आता एक आठवडा उलटला आहे. यामध्ये आजवर 40 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 165 जण अजूनही बेपत्ता आहेत. तपोवन टनेलमधून (Tapovan Tunnel) 120 मीटर खोदकाम केल्यानंतर रविवारी 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता या शोधकार्याचा वेग वाढवण्यात आला आहे. चमोलीच्या ऋषिगंगा प्रकल्पात आलेल्या जलप्रलयाचे साक्षीदार असलेले जण सुदैवी ठरले, कारण ते आज जिवंत आहेत. तपोवन मधील NTPC प्रोजेक्टमध्ये अवजड वाहन चालवणारे 27 वर्षांचे ड्रायव्हर विपूल कैरेनी देखील या सुदैवी व्यक्तींपैकी एक आहेत. मागच्या रविवारी त्यांची ड्यूटी होती. ऋषीगंगामध्ये जलप्रलय होण्याच्या पूर्वी त्यांना त्यांची आई मंगश्री देवी यांचा फोन आला होता. ( वाचा : Glacier Burst in Uttarakhand: सेनेचे जवान ठरत आहेत देवदूत ) त्या दिवशी नेमकं काय घडलं? “मला आईचा फोन आला होता. मी कामात असल्यानं सुरुवातीला त्या फोनकडं दुर्लक्ष केलं. पण आईनं हार मानली नाही. ती सतत फोन करत होती. अखेर मी तिचा फोन उचलला. तेव्हा धौलीगंगामध्ये पूर आला असून तू तुझ्या सर्व सहकाऱ्यांसह तातडीनं बाहेर पड, असं आईनं सांगितलं. आईच्या सुचनेप्रमाणे आम्ही सर्व जण वागलो. त्यामुळे आमचा जीव वाचला.’’ अशी त्या दिवसाची आठवण विपूल यांनी सांगितली आहे. “माझं गाव उंचावर आहे. जलप्रलय आला तेव्हा आई घराच्या बाहेर काम करत होती. तिनं पूर पाहिला आणि लगेच मला फोन केला. आईनं वेळीच फोन केला नसता, तर आज मी आणि माझे दोन डझन सहकारी जिवंत नसतो,’’ असं विपूलनं सांगितले आहे. “आपल्याला रोजच्या कामासाठी 600 रुपये मिळतात. मात्र रविवारी काम केलं तर दुप्पट पैसे मिळतात. 7 फेब्रुवारी रोजी रविवारची सुट्टी असल्यानं मी कामावर गेलो होतो. तेव्हा सकाळी 10 वाजता आईचा फोन आला. त्यानंतर मी आणि माझे सहकारी एका शिडीच्या मदतीनं तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झालो.’’ असं विपूल यांनी म्हंटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.