नवी दिल्ली 9 फेब्रुवारी : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ऋषिगंगा हिमकडा कोसळल्यानं महापूर (Uttarakhand Chamoli Glacier Burst) आला आहे. या दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सेना, एअरफोर्स, नेवी, आईटीबीपी (ITBP) आणि एनडीआरएफचे (NDRF) जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या कठीण काळात हे जवान देवदूत ठरले आहेत. सैन्य दलातील विविध तुकड्या पूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवत आहेत. या आपत्तीच्या काळात अडकलेल्या इतर लोकांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि साहित्य पुरवण्यातही मदत केली जात आहे. भारतीय हवाई दलाचे प्रवक्ता विंग कमांडर इंद्रनील नंदी यांचे म्हणणे आहे, की उत्तराखंडमधील आपत्तीची माहिती हवाई दलाला 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 27 मिनीटांनी मिळाली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हवाई दलाने आवश्यक वाहतूक आणि हेलिकॉप्टर स्टँडबाय मोडवर ठेवली होती. या घटनेची माहिती मिळताच भारतीय वायुदलाच्या एका C-17, दोन C-130, चार AN-32 आणि एक चिनूकसह चार ALH हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. त्याद्वारे एनडीआरएफ आणि नेव्हीच्या मार्कोज कमांडोजच्या पथकासह सुमारे 20 टन मदत साहित्य रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देहरादूनला पोहोचवण्यात आलं आहे. रैणी गावात 200 जवान तैनात एवढंच नाही, तर लष्कराचे 2 स्तंभ म्हणजे सुमारे 200 जवान जोशीमठ ते रैनी गावात तैनात केले आहेत. तर 4 स्तंभ म्हणजे 400 जवान स्टँडबायनं तयार बसले आहेत. जोशीमठ येथे लष्करानं एक नियंत्रण कक्षदेखील स्थापित केला आहे आणि आर्मी एव्हिएशनची दोन चिता हेलिकॉप्टर सातत्याने या भागाची पाहणी करीत आहेत तसंच गरजू लोकांना मदत करत आहेत. यादरम्यान लष्कराची इंजिनिअरिंग टास्क फोर्सदेखील तैनात केली गेली आहे. जोशीमठ बोगद्यात अडकलेल्या लोकांना 2 जेसीबी मशीनच्या माध्यमातून बाहेर काढण्यात येत आहे. इतकंच नाही तर जखमींना रूग्णवाहिका किंवा हेलिकॉप्टरद्वारे फील्ड हॉस्पिटलमध्ये पोहोचवून उपचार केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.