वसीम अहमद, प्रतिनिधी अलिगड , 28 जुलै : सीमा हैदर आणि अंजू प्रकरण तापलेलं असतानाच आता उत्तर प्रदेशातल्या एका नवऱ्याने चक्क त्याच्या बायकोच्याच ATS चौकशीची मागणी केली आहे. तसं रीतसर पत्रच त्याने पोलीस अधीक्षकांना दिलंय. या पत्रावरून आता पोलीसही हादरले आहेत. विशेष म्हणजे या नवरा-बायकोची ओळखसुद्धा सोशल मीडियावरूनच झाली होती. ‘माझी बायको महागडे-महागडे फोन वापरते, वेगवेगळ्या नावांचे ओळखपत्र बाळगते, असं सांगून ती ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS)‘च्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करत तिची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करा’, अशी मागणी या नवऱ्याने केली आहे.’
उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्याच्या नगला पटवारी भागात राहणाऱ्या सिराज अली यांनी सांगितलं की, ‘2 वर्षांपूर्वी माझी एका मुलीशी फेसबुकवरून ओळख झाली होती. तिने ती अनाथ असल्याचं सांगितलं. मला कोणाचाच आधार नाहीये, असं ती म्हणाली. त्यानंतर आम्ही एकमेकांची दररोज बोलू लागलो. हळूहळू आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती एक सर्वसाधारण विचारांची चांगली मुलगी आहे, असं मला वाटलं होतं. लग्नानंतर सर्वकाही गुण्या-गोविंदाने सुरू होतं. मात्र काही दिवसांनी माझी बायको महागडे-महागडे फोन वापरू लागली. तिच्याकडे असंख्य ओळखपत्रदेखील होते. हे सगळं पाहून मला तिच्यावर संशय येऊ लागला.’ सीमा हैदरवर संशय बळावला, ‘कराची कनेक्शनचा’ तपास सुरू पुढे त्याने सांगितलं, ‘एकदा मी आजारी होतो. तेव्हा ती मला नोएडाला घेऊन गेली होती. त्यावेळी मी तिच्या बँक खात्यात तब्बल 21 लाख रुपये पाहिले आणि मला धक्काच बसला. लग्नाआधी ती अनाथ होती, मग तिच्याकडे एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न मला पडला. तेव्हापासून मी तिच्यावर बारीक लक्ष ठेवू लागलो. मी तिचं खूप काळापासून निरीक्षण करतोय, ती अनेक फोन वापरते. या सगळ्यावरून मला असा दाट संशय आहे की, ती दहशतवादी संघटनांसाठी काम करते.’ ‘मी 2 वर्षांपूर्वी तिच्याशी निकाह केला तेव्हा तिने तिचं नाव ‘हसीना’ आहे असं सांगितलं होतं. मात्र आता तिच्याकडे हसीनासह पूजा, मनीषा यांसारख्या विविध नावांची ओळखपत्र आहेत. ती आयसिसची सदस्य असू शकते आणि असं असेल तर हा देशासाठी मोठा धोका आहे’, असंही सिराज अली याने सांगितलं.